Nilesh Rane: शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी 26 नोव्हेंबर रोजी मालवणमधील भाजपचे पदाधिकारी विजय किनवडेकर (Vijay Kinwadkar) यांच्या राहत्या घरी धाड टाकली. या वेळी त्यांच्या घरी अवैध पद्धतीने साठवलेली मोठी रोख रक्कम सापडली. खोलीत हिरव्या पिशवीत अंदाजे 25 लाख रुपये आढळले, अशी माहिती निलेश राणे यांनी दिली. यावेळी त्यांनी रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्यावरही गंभीर आरोप केले आणि सांगितले की, पैशांचे वाटप वेगाने सुरू आहे. या प्रकरणातून मालवण निवडणुकीत भाजप व शिवसेना शिंदे गटामध्ये तणावाचे वातावरण तयार झाल्याचे दिसून येते.
निलेश राणे म्हणाले की, निवडणूक आयोगाने आणि पोलिसांनी पैसे जप्त केले आहेत तर त्यावर योग्य कारवाई होणे आवश्यक आहे. “एफआरआय, नोटीस किंवा तपास अजून पूर्ण झालेले नाही. पैशांचा स्रोत कुणाकडे आहे याचा तपशील घेतला नाही. भाजप मालवण नगरपरिषदेच्या उमेदवार शिल्पा खोत (Shilpa Khot) यांच्याविरोधात कोर्टात गेले होते, पण वकील उपस्थित नव्हते. हा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
गुन्हा झाला तर कारवाई होणे आवश्यक
निलेश राणे म्हणाले की, विजय किनवडेकर यांच्या घरी परवानगी न घेता प्रवेश केला नाही. गुन्हा घडला तर त्यावर त्वरित कारवाई होणे आवश्यक आहे. “अनधिकृत प्रवेशावर आरोप करणे लाजीरवाणी आहे. शासकीय कामाला वेळ लागतो, तो दिला आहे, पण गुन्हा दाखल केला पाहिजे,” असे त्यांनी सांगितले. तसेच अन्य दोन व्यक्तींवर देखील गुन्हा दाखल होणे आवश्यक असल्याचे राणे यांनी ठळकपणे म्हटले.
थेट आरोप रवींद्र चव्हाण यांच्यावर
निलेश राणे म्हणाले की, “मी पुराव्यांच्या आधारावर बोलतो. माझा आरोप थेट रवींद्र चव्हाण यांच्यावर आहे. ते आणि त्यांचे लोक यातील कारवाईंपासून वाचू शकणार नाहीत. आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे.” त्यांनी राज्यातील निवडणूक प्रक्रियेतील भ्रष्टाचार आणि पैशाच्या वाटपावर चिंता व्यक्त केली.






