Nilesh Ghaywal: पुण्यातील (Pune City) गुन्हेगारी जगतात एकेकाळी गाजलेलं नाव असलेला निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण यावेळी त्याच्या आईने, कुसुम घायवळ (Kusum Ghaywal) यांनी माध्यमांसमोर धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही प्रभावशाली राजकारण्यांना निलेश गुन्हेगारीतून बाहेर पडावा, चांगले आयुष्य जगावे हे अजिबात नको होते. उलट, त्याला पुन्हा गुन्ह्यांत अडकवण्यासाठी आणि त्याची प्रतिमा खराब करण्यासाठी राजकीय पातळीवरून खेळी केली गेली.
कुसुम घायवळ यांनी सांगितले की, निलेशला आता गुन्हेगारी सोडून सामान्य जीवन जगायचे होते. न्यायालयाने अनेक गुन्ह्यांमधून त्याची निर्दोष सुटका केली होती. त्यानंतर तो आपल्या कुटुंबासह स्थिर जीवन जगत होता. परंतु, राजकीय नेत्यांनी त्याला पुन्हा अडचणीत आणण्यासाठी कारस्थान रचले. “राजकारणी लोक माझ्या मुलाला वर येऊ द्यायचे नाहीत. त्याने समाजात चांगले नाव कमवावे हे त्यांना नको आहे. त्यांना तो कायम जेलमध्येच राहावा, गुन्हेगारीच्या सावलीतच राहावा असेच वाटते,” असे भावनिक शब्दात त्या म्हणाल्या.
निलेश घायवळ जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad Election) निवडणुकीच्या रिंगणात उतरायच्या तयारीत होता. नगर जिल्ह्यातील (Nagar District) सोनेगाव (Sonegav) मतदारसंघातून तो उमेदवारी देणार होता. मात्र, निवडणूक जवळ येताच त्याच्याविरोधात कारस्थान रचले गेले, असा दावा त्याच्या आईने केला आहे. “माझ्या मुलाला राजकारणात प्रवेश करायचा होता. पण त्याला रोखण्यासाठी विरोधकांनी ठरवून त्याच्यावर गुन्हे लादले. त्याला गुन्हेगार म्हणूनच दाखवायचं हेच त्यांचं उद्दिष्ट होतं,” असं त्यांनी सांगितलं.
गेल्या काही वर्षांपासून निलेशने गुन्हेगारी जग सोडून नवा मार्ग निवडला होता. पण एका गोळीबार प्रकरणानंतर तो लंडनला (London) पळून गेला. पोलिस आणि पासपोर्ट विभागातील काही राजकीय संपर्कांमुळेच त्याला परदेशात जाण्यास मदत झाली, असेही आरोप आहेत. या घटनेनंतर महाराष्ट्रातील (Maharashtra Politics) राजकारणात खळबळ उडाली आहे.
“माझा मुलगा काही देवदूत नाही, पण त्याने गुन्हेगारीचा रस्ता सोडला होता. त्याला राजकारणात यायचं होतं. मात्र, काही नेत्यांना ते मान्य नव्हतं. म्हणूनच त्यांनी त्याला फसवलं,” असं सांगताना कुसुम घायवळ यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
या प्रकरणामुळे निलेश घायवळ आणि त्याचे राजकीय संबंध पुन्हा चर्चेत आले आहेत. स्थानिक राजकारणातील सत्तासंघर्ष, गुन्हेगारी व राजकीय हितसंबंध यांचं जाळं या प्रकरणामुळे उघड झाल्याचं बोललं जातं.






