Nilesh Chavan : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात फरार असलेला मुख्य आरोपी निलेश चव्हाणला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. नेपाळ सीमेवरून त्याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले. तो गेल्या 10 दिवसांपासून फरार होता. महाराष्ट्रासह दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश या राज्यांतून पळ काढत नेपाळमध्ये पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.
दोन ठिकाणी दोन गुन्हे
निलेश चव्हाणवर दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. बावधन पोलिसांनी त्याला वैष्णवीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहआरोपी म्हणून दाखल केले आहे, तर वारजे पोलिसांनी वैष्णवीच्या नऊ महिन्यांच्या बाळाच्या ताब्यावरून झालेल्या वादात गुन्हा नोंदवला आहे.
20 मे रोजी वैष्णवीच्या माहेरच्यांनी बाळाला परत मिळवण्यासाठी कर्वेनगरमधील निलेश चव्हाणच्या घरी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र निलेशने त्यांना पिस्तुल दाखवून धमकावले आणि बाळाचा ताबा देण्यास स्पष्ट नकार दिला. या घटनेनंतर कस्पटे कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून निलेशविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
फरार निलेशसाठी राज्यभर शोधमोहीम
निलेश चव्हाण फरार झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड आणि पुणे पोलिसांनी संयुक्तरीत्या शोधमोहीम राबवली. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून राज्याबाहेरही शोध घेतला. निलेश देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती.
कोण आहे निलेश चव्हाण?
निलेश चव्हाण हा बांधकाम व्यावसायिक असून, पोकलेन मशीन व्यवसायातही तो सक्रीय आहे. वैष्णवीची नणंद करिश्मा हगवणे हिचा तो जवळचा मित्र असल्याचे समोर आले आहे. शशांक आणि वैष्णवी यांच्यातील कौटुंबिक वादात निलेश वारंवार हस्तक्षेप करत असे.
याआधीही त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. 14 जून 2022 रोजी पत्नीच्या तक्रारीवरून त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणात त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, जो सत्र न्यायालयाने फेटाळला, मात्र नंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्याला दिलासा दिला.
पुढील कारवाईची प्रतीक्षा
सध्या निलेश चव्हाण पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या ताब्यात असून, त्याच्यावर दोन्ही प्रकरणांमध्ये कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणाने राजकीय व सामाजिक पातळीवर मोठा गहजब निर्माण केला असून, आरोपींविरोधात कठोर पावले उचलण्याची मागणी वाढत आहे.
nilesh-chavan-finally-arrested-by-the-police