याच चर्चेत, महाराष्ट्रातील काही नेते जाणीवपूर्वक समाजाला फोडत असून हे गद्दारपण सहन करणार नाही, अशी कठोर भूमिका निलेश चंद्र यांनी घेतली. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सोबत असलेल्या काही विशिष्ट राजकीय व्यक्तींमुळे जैन समाजाची अडचण वाढत असल्याचं ते म्हणाले. तसेच योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केल्यास राज्यातील गैरव्यवहार स्वच्छ होतील, अशी स्पष्ट टिप्पणीही त्यांनी नोंदवली.
दादरच्या कबुतरखान्याभोवती निर्माण झालेल्या वादाचा उल्लेख करताना निलेश चंद्र म्हणाले की, जैन समुदायाने कधीही इतरांच्या धार्मिक स्थळांना हात लावून स्वतःची स्थळं उभी केली नाहीत. उलट शांततेच्या मार्गावर चालणाऱ्या या समुदायाच्या मंदिरांवरच कार्यवाही का होते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विलेपार्लेतील मंदिरावर चाललेल्या बुलडोझर कारवाईचा उल्लेख करत त्यांनी विचारलं, “जर अवैध बांधकामांवरच मोहीम असेल, तर मग इतर ठिकाणच्या अवैध मशिदी कशा वाचल्या?”
त्यांनी सांगितले की, काही नेत्यांनी चर्चेचा तोडगा काढू असं सांगितलं होतं, पण त्याचा काहीही परिणाम दिसला नाही. त्यामुळे या अन्यायामागे असलेल्या नेत्यांना ते “सोडणार नाहीत” अशी परखड भूमिका त्यांनी स्पष्ट केली. “माझे प्राण गेले तरी चालतील, पण समाजाचा अपमान करणाऱ्यांना उत्तर मिळालंच पाहिजे,” असा त्यांचा ठाम निर्धार होता.
मनसेच्या आक्रमक भूमिकेवर प्रतिक्रिया देताना निलेश चंद्र यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, मारवाडी समाजाविरोधात टीका करणाऱ्यांनी मुंबईतील भेंडी बाजार किंवा मुस्लिमबहुल भागांत जाऊन तेथील वास्तव बघावं. “मुंब्र्यात एका वर्षात शंभर कबरी उभ्या झाल्या, बांगलादेशी राहत आहेत, याकडे लक्ष नाही. पण फक्त दादरचा मुद्दा उचलून आम्हाला लक्ष्य केलं जातं,” अशी चुटकी त्यांनी घेतली.
जैन समाजाचा स्वतंत्र राजकीय पक्ष नसल्याने प्रत्येकवेळी एखाद्या गटाकडे जावं लागतं, पण यामुळे समुदायाची भूमिका स्पष्टपणे मांडणं कठीण होत असल्याचं ते म्हणाले. त्यामुळे भविष्यात स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याचा विचार त्यांनी व्यक्त केला. निवडणुकीत जाणीवपूर्वक जाती-भाषांवरून तणाव वाढवला जातो आणि महापालिका निवडणूक संपली की हे सर्व विषय शांत होतात, असाही आरोप त्यांनी केला.