Disha Salian : दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. मालवणी पोलिसांच्या तपासानुसार, दिशाने आर्थिक तणावामुळे आत्महत्या केली होती. क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद केल्यानुसार, दिशाला वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक भार सहन करावा लागत होता. आपल्या कष्टाने कमावलेला पैसा नको त्या ठिकाणी खर्च होत असल्याने ती मानसिकदृष्ट्या तणावाखाली होती. याबाबत तिने आपल्या काही मित्रांसोबतही चर्चा केली होती.
शवविच्छेदन अहवालात काय?
८ जून २०२० रोजी दिशाचा मृत्यू झाला होता, आणि तीन दिवसांनंतर तिचे शवविच्छेदन करण्यात आले. अहवालानुसार, दिशाच्या शरीरावर हात, पाय आणि छातीवर जखमा होत्या, तसेच डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचे नमूद आहे. शिवाय, नाक आणि तोंडातून रक्तस्त्राव झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे की दिशावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाला नव्हता.
ठाकरेंवर आरोप आणि वकील निलेश ओझांचा वादग्रस्त इतिहास
दरम्यान, वकील निलेश ओझा यांनी या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मात्र, निलेश ओझा यांची पार्श्वभूमी वादग्रस्त राहिली आहे. २०२० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने न्यायसंस्थेवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याबद्दल ओझा यांना आर्थिक दंडासह तीन महिन्यांची शिक्षा सुनावली होती. त्यांच्या काही याचिकांवरही न्यायसंस्थेने कठोर भूमिका घेतली होती.
दिशाच्या मृत्यूबाबत पोलिसांचा निष्कर्ष
मालवणी पोलिसांनी यापूर्वीच दिशाने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष नोंदवला होता. आर्थिक अडचणी, कौटुंबिक तणाव आणि वाढत्या मानसिक तणावामुळे दिशाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांच्या तपासातून स्पष्ट झाले आहे.
ही घटना आणि तिच्याभोवती उभे राहिलेले राजकीय आरोप-प्रत्यारोप यामुळे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.