कोरोनावर रामबाण औषध ठरणार कडुलिंबाची कॅप्सूल! मानवी चाचणीला सुरुवात

नवी दिल्ली | कोरोना व्हायरसवर प्रभावी लस तयार करण्यासाठी अनेक देशातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. दरम्यान, अनेक देशांनी आपण कोरोनावर प्रभावी औषध तयार केल्याचा दावा केला आहे.

मात्र, आता कोरोनावर मात करण्यासाठी आयुर्वेद औषधानेही पुढाकार घेतला आहे. शरीरातून कोरोनाला नष्ट करण्यासाठी कडुलिंब प्रभावी औषध ठरणार आहे. त्यासाठी कडुलिंबाच्या कॅप्सूलची मानवी चाचणी घेण्यात येत आहे.

जर ही मानवी चाचणी यशस्वी झाली तर घरात आपण वापरत असलेले कडुलिंब कोरोनावर मात करण्यासाठी मदत करेल. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या मदतीने आयुर्वेद कंपनी निसारग बायोटेक कडुलिंबाच्या कॅप्सूलवर संशोधन करीत आहे.

दरम्यान, ऑगस्टपासून या कॅप्सूलवर संशोधन प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच १२ ऑगस्टपासून कडुलिंबाने बनवलेल्या या कॅप्सूलच्या मानवी चाचणीला सुरुवात झाली आहे. या दोन्ही संघटना कोरोनाबाधित रूग्णांना कडुलिंबाच्या कॅप्सूल देणार आहेत.

या कॅप्सूल कोरोनाबाधित रुग्णांना दिल्यानंतर, हे कॅप्सूल बाधित रुग्णांवर किती प्रभावी ठरेल हे पहिले जाणार आहे. आयुष मंत्रालय, हरियाणा सरकार आणि भारत सरकार यांच्याकडून परवानगी मिळाल्यानंतर, फरीदाबादच्या ESIC रुग्णालयात त्या कॅप्सूलची तपासणी केली जाणार आहे.

या संशोधनाचे मुख्य परीक्षक म्हणून अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानचे संचालक डॉ. तनुजा नेसरी आहेत. फरीदाबादमधील ESIC रुग्णालयाचे डीन डॉ असीम दास म्हणाले की, कोरोनाबाधित रुग्णांची काळजी घेणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची देखील तपासणी केली जाईल.

यामध्ये कोरोना नसलेल्या व्यक्तींचा समावेश असेल. असे केल्याने ही कॅप्सूल कोरोना रुग्णांवर किती प्रभावी ठरेल, तसेच ती किती सक्षम आहे हे शोधणे सोपे होईल.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणू हा स्नायूंना चिकटून शरीरात प्रवेश करतो. त्यानंतर प्रयोगशाळेत केलेल्या संशोधनात असे दिसून आले की, कडुलिंब व्हायरसची प्रतिकृती थांबविण्याचे कार्य करते. ज्यामुळे विषाणूचे प्रमाण कमी होते, डॉक्टरांना अशी आशा आहे की, यामुळे शरीरातील कोरोना पुर्णपणे नष्ट होईल.

एकूण २५० लोकांवर कडुलिंबाच्या कॅप्सूलची चाचणी केली जाईल. त्यानंतर हे दिसून येईल की कडुलिंब शरीरातील कोरोना नष्ट करण्यास किती मदत करते.

सध्या ७० जणांच्या रक्त चाचण्या व कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. दरम्यान, अर्ध्या रुग्णांना कडुलिंबाचे कॅप्सूल आणि अर्ध्या रुग्णांना प्लाझीबो कॅप्सूल देण्यात आले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.