शिवसेनेच्या दबावापुढे राष्ट्रवादीची माघार; पाच नगरसेवकांचा पुन्हा शिवसेनेत प्रवेश

मुंबई । अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या पाच शिवसेना नगरसेवकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला होता.

महाविकास आघाडीतील पक्षांमध्येच फोडाफोडी सुरु झाल्याने विरोधकांना टीका करण्याची संधी मिळाली होती. अखेर आता राजकीय नाट्यावर पडदा पडला असून नगरसेवक पुन्हा स्वगृही शिवसेनेत परतले आहेत.

अजित पवार यांच्या उपस्थितीत नगरसेवक मुदस्सर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी आणि नंदा देशमाने यांनी प्रवेश केला होता.

या प्रवेशानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना या प्रकरणी मध्यस्थी करावी लागली.

पवार यांनी मातोश्रीवर ठाकरे यांची भेट घेत चर्चा केली होती. शिवसेनेच्या पाच नगरसेवकांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेले पक्ष प्रवेश उद्धव ठाकरेंना फार रुचलेले नव्हते.

त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी वाढू नये यासाठी शिवसेनेने नगरसेवकांना परत पाठवण्याचा निरोप अजित पवार यांना दिला होता. अखेर नगरसेवकांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.