Share

Sharad Pawar And Ajit Pawar : राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ; राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र, भाजपसमोर नवे समीकरण

Sharad Pawar And Ajit Pawar : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून, नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress Party) दोन गटांमध्ये  शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार निर्माण झालेली फूट आता काही प्रमाणात भरून निघाल्याचं चित्र दिसतंय. कारण, चंदगड नगर परिषद (Chandgad Nagar Parishad) निवडणुकीत हे दोन्ही गट प्रथमच एकत्र लढणार आहेत.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अनेकांनी दोन्ही बाजूंनी एकत्र यावं, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर एकत्रीकरणाच्या चर्चांना गती मिळाली होती. काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी पक्षाच्या बैठकीत भाजपसोबत कोणत्याही परिस्थितीत आघाडी नको, असा ठाम संदेश दिला होता. त्यानंतर आता दोन्ही गट एकत्र येण्याने राज्यातील राजकीय समीकरणे पुन्हा ढवळून निघाली आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur District) चंदगड नगर परिषदेत अनपेक्षित पण ऐतिहासिक घडामोड घडली आहे. कुटुंबातील राजकीय विभागणीनंतर प्रथमच राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी एकत्र येत “शहर विकास आघाडी” निर्माण केली आहे.

या आघाडीची मध्यस्थी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केली. गडहिंग्लज (Gadhinglaj) येथील त्यांच्या कार्यालयात झालेल्या चर्चेत शरद पवार गटाच्या नंदाताई बाभुळकर (Nandatai Babhulkar) आणि अजित पवार गटाचे राजेश पाटील (Rajesh Patil) सहभागी झाले. या चर्चेनंतर दोन्ही गटांनी भाजप (BJP) विरोधात एकत्र लढण्याचा निर्णय घेतला.

बैठकीनंतर पक्ष सूत्रांनी सांगितले की, ही आघाडी स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि भाजपला रोखण्यासाठी करण्यात आली आहे. या आघाडीत नंदाताई बाभुळकर आणि राजेश पाटील हे दोन्ही गटांकडून प्रमुख नेते म्हणून पुढे आले आहेत.

या एकत्र येण्याने चंदगड नगर परिषद निवडणुकीची रंगत वाढली असून, भाजपसमोर आता मोठे आव्हान उभे राहिले आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणे म्हणजे आगामी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीचे संकेत मानले जात आहेत. राजकीय निरीक्षकांच्या मते, या घडामोडीमुळे राज्यात पुन्हा एकदा महत्त्वाचे राजकीय समीकरण तयार होण्याची चिन्हे आहेत.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now