Pravin Gaikwad and Sharad Pawar: सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील अक्कलकोट (Akkalkot) येथे रविवारी घडलेल्या हल्ल्यामुळे राज्यात मोठी राजकीय आणि सामाजिक खळबळ उडाली. संभाजी ब्रिगेडचे (Sambhaji Brigade) प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Pravin Gaikwad) यांच्यावर शिवधर्म संघटनेच्या (Shivdharma Foundation) काही कार्यकर्त्यांनी हल्ला केला. यामध्ये त्यांच्या अंगावर वंगणाचे तेल टाकले गेले आणि चेहरा काळ्या रंगाने फासण्यात आला.
या प्रकारानंतर अनेक राजकीय आणि सामाजिक नेत्यांनी गायकवाड यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP – Sharad Pawar Group) संस्थापक शरद पवार (Sharad Pawar) यांचा देखील समावेश होता. गायकवाड यांनी सोलापूर येथे माध्यमांशी बोलताना सांगितले की, “पवार साहेबांनी फोन करून माझी विचारपूस केली आणि मला सांगितलं की, ‘तू मला नातवासारखा आहेस, काळजी घे.’”
अनेक नेत्यांनी व्यक्त केली सहवेदना
प्रवीण गायकवाड यांनी सांगितले की, “या हल्ल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून मला फोन येईल, अशी अपेक्षा नव्हती. मात्र अनेक दिग्गजांनी मला फोन केला. यामध्ये सुप्रिया सुळे (Supriya Sule), रोहित पवार (Rohit Pawar), रोहित पाटील, विश्वजित कदम (Vishwajeet Kadam), सतेज पाटील, पुरुषोत्तम खेडेकर, सदाभाऊ खोत (Sadabhau Khot), माधव जानकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांचा समावेश आहे.”
पोलिसांवर दुर्लक्षाचे आरोप
गायकवाड यांनी पोलिसांवर ताशेरे ओढताना सांगितले की, “हल्लेखोरांपैकी बहुतेकांना अटक करण्यात आलेली नाही. फक्त दीपक काटे (Deepak Kate) याला ताब्यात घेतले आहे आणि त्यालाही पोलीस ठाण्यात संरक्षण देण्याचे निर्देश मिळाले. हा प्रकार माझ्या जीवावर बेतलेला हल्ला होता, त्यामुळे 307 या कलमान्वये गुन्हा दाखल व्हायला हवा होता.”
तसेच, झटापटीदरम्यान अनेक कार्यकर्त्यांच्या गळ्यातील साखळ्या चोरीस गेल्या, गाड्यांचे नुकसान झाले, तरीही पोलिसांनी फक्त शाईफेकीचा गुन्हा नोंदवला, हे धोकादायक असल्याचे त्यांनी नमूद केले.
भाजपची प्रतिक्रिया
या हल्ल्यानंतर भाजपचे (BJP) मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, “प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आमचा पक्ष तीव्र निषेध करतो. हिंसेवर आमचा विश्वास नाही. संबंधित व्यक्ती भाजपशी संबंधित असली, तरी कायदा त्याचे काम करेल. कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही.”