सोलापूर | सोलापूर महापालिकेतील शिवसेना नगरसेवक आणि सभागृहातील विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. याची माहिती देणारे एक ट्विट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. पण काही तासांमध्येच हे ट्विट डिलीट करण्यात आले. यानंतर हे ट्विट डिलीट करण्याची वेळ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवर का आली? याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.
दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन वर्ष उलटले आहे. यानंतर मात्र शिवसेनेच्या एखाद्या मोठ्या नेत्याने अशाप्रकारे मित्रपक्ष राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे महेश कोठे यांच्या राष्ट्रवादीत होणाऱ्या प्रवेशावरून काहीसा तणाव असल्याचे समोर आले होते.
गेल्या विधानसभा निवडणूकांपासूनच महेश कोठे हे शिवसेनेवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. यानंतर त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा होती. महेश कोठे यांची राष्ट्रवादीच्या पक्षप्रवेशापुर्वीच शिवसेनेतुन हकलपट्टी करण्यात आली होती. विशेष बाब म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली.
शिवसेना आणि राष्ट्रवादी या राज्यात सोबत सत्तेत असणाऱ्या दोन्ही पक्षात याबाबत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभुमीवर हा पक्षप्रवेश लांबणीवर पडण्याची शक्यता होती. परंतु त्यानंतर शरद पवारांच्या उपस्थितीत महेश कोठे यांचा पक्षप्रवेश झाला. ही माहिती शरद पवार यांनी ट्विट करत दिली. आणि काही वेळातच हे ट्विट डिलीट केले.
महाविकास आघाडीत सर्व काही सुरळीत चालत आहे असं दोन्ही पक्षातील नेते नेहमी सांगतात. परंतु स्थानिक राजकारणावरून वादाची ठिणगी पडत असल्याचे समोर येत आहे. दरम्यान, महेश कोठे यांच्यासोबत अनेक माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यावर शिवसेनेची भुमिका महत्त्वाची असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भंडाऱ्याच्या घटनेवर राहुल गांधींनी व्यक्त केली हळहळ; ठाकरे सरकारकडे केली ‘ही’ मागणी
हृदयद्रावक! भंडाऱ्यात शिशु केअर युनिटला आग; दहा नवजात चिमुकल्यांचा मृत्यू
औरंगाबाद नामांतरावरून उदयनराजे भडकले, म्हणाले…