पंढरीचा पैलवान गेला! राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तडफदार आमदार भारत भालके यांचं पुण्यात निधन

पुणे | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे तडफदार आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी मध्यरात्री पुण्यात निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. आमदार भालके यांना ३० ऑक्टोबर रोजी कोरोनाची लागन झाली होती. मात्र त्यातून ते बरे झाले होते.

पण गेल्या काही दिवसांपासून त्यांना पुन्हा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे त्यांना पुण्यातील रूबी हॉल क्लिनीक या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

काल त्यांची तब्येत जास्तच खालावल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भारतनानांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली होती. तसेच इतरही अनेकांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. मात्र शुक्रवारी मध्यरात्री त्यांचे निधन झाले.

त्यांच्यामागे पत्नी, तीन विवाहीत मुली, मुलगा, असा परीवार आहे. शनिवारी पंढरपूरमधील सरकोली या त्यांच्या गावात त्यांचा अंत्यविधी होईल. भारतनानांच्या निधनाने कार्यकर्त्यांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

सन २००९ पासून ते सलग तीन वेळा आमदार राहीलेले आहेत. दिग्गज नेते विजयसिंह मोहीते पाटील यांचा त्यांनी २००९ साली अपक्ष उभे राहत धक्कादायक पराभव केला होता.

तर २०१९ ला राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवडणूक लढवत जेष्ठ नेते सुधाकरपंत परीचारक यांचा पराभव केला होता. २००२ पासून ते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष होते.

राज्यातील अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहीली आहे.

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.