भाजपला लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत मात देण्यासाठी महाविकास आघाडी तयारी करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने दोन्ही निवडणूका एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांनी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणूकाही एकत्रच लढण्याचा निर्णय घेतला आहे.
महाविकास आघाडी मजबूत करण्यासाठी आता वंचित बहुजन आघाडी सुद्धा महाविकास आघाडीत सामील झाली आहे. पण हे सर्व सुरु असतानाच महाविकास आघाडीत फुट पडल्याचं चित्र समोर आलं आहे. पुरंदर विधानसभा निवडणूकीसाठी महाविकास आघाडीमध्ये फुट पडली आहे.
पुरंदर विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे दिसत आहे. पुरंदर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यभरात हा चर्चेचा विषय ठरला आहे.
हैराण करणारी गोष्ट म्हणजे विधानसभा निवडणूकीसोबतच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूकही स्वबळावर लढण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. त्यामुळे आता पुढील विधानसभा निवडणूकीच्या आधीच महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे.
माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांची राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून निवड झाली आहे. पारगाव मेमाणे येथे बेलसर-माळशिरस जिल्हा परिषद गटाचा मेळावा पार पडला होता. तिथे राष्ट्रवादीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. पुरंदरमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाशी युती होणार नसल्याचे राष्ट्रावादीने स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादीला ग्रामीण भागात चांगला पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढली तर राष्ट्रवादीलाच ती फायदेशीर ठरणार आहे. तरुण वर्गही राष्ट्रवादीकडे वळत असल्याने पुरंदरमध्ये राष्ट्रवादीने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.