Share

नवनीत राणांच्या खोटेपणाचा पोलीस आयुक्तांनी केला पर्दाफाश; थेट पुराव्याचा व्हिडीओच समोर आणला

तुरुंगात मिळणाऱ्या वागणुकीवरून खासदार नवनीत राणा(Navneet Rana) यांनी मुंबई पोलिसांवर आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केले होते. अनुसूचित जातीची असल्यामुळे मला तुरूंगात रात्रभर पाणी दिले नाही. उलट मला पाणी मागितल्यामुळे जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. मला वॉशरूमलाही जाऊ दिलं नाही, असा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला होता.(navneet rana allegations Exposed by the Commissioner of mumbai police)

यानंतर भाजप नेत्यांनी मुंबई पोलिसांवर देखील आरोप केले होते. खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या आरोपांवर मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ मुंबईमधील खार पोलीस स्थानकातील आहे.

या व्हिडिओमध्ये राणा दाम्पत्य पोलीस ठाण्यात चहा पित आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ ट्विट करत असताना मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी लिहिले आहे की, यापेक्षा आम्हाला जास्त काही बोलायची गरज आहे का? असा उलट प्रश्न संजय पांडे यांनी विचारला आहे.

खासदार नवनीत राणांनी केलेले आरोप मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी खोडून काढले आहेत. त्यामुळे नवनीत राणांनी केलेले आरोप खोटे असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. तुरुंगात मिळणाऱ्या वागणुकीवरून खासदार नवनीत राणांनी वकिलांमार्फत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून तक्रार केली होती.

“मला २३ एप्रिल २०२२ रोजी मुंबईतील खार पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. मी संपूर्ण रात्र पोलीस ठाण्यात काढली. मी पिण्यासाठी पाणी मागितले. पण मला रात्रभर पाणी दिले गेले नाही. उलट मला पाणी मागितल्यामुळे जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. मी अनुसूचित जातीची आहे, यामुळे मला पाणी पिण्यासारखा मूलभूत हक्क देखील नाकारण्यात आला”, असे खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पात्रात म्हंटले होते.

या सर्व प्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. “नवनीत राणा यांना तुरुंगात अतिशय हीन दर्जाची वागणूक दिली जात आहे. नवनीत राणा यांना पिण्याचं पाणी देखील दिलं जात नाही. त्यांना वॉशरूमला देखील जाऊ दिलं नाही. हे अतिशय धक्कादायक आहे. लोकशाहीला काळिमा फासणारी ही घटना आहे”, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

 

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now