Farmer Success Story : शेतकऱ्याच्या कष्टाला दाद मिळावी, त्याच्या मेहनतीचं सोनं व्हावं, हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण पावसाचा लहरीपणा, बाजारभावाची अनिश्चितता आणि वाढत्या खर्चामुळे बळीराजा अनेकदा हताश होतो. पण या सगळ्याला झुगारून नाशिक (Nashik) जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याने इस्रायलच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आपल्या शेतीतून तब्बल ७ लाखांचं उत्पन्न मिळवलं! विशेष म्हणजे त्यासाठी त्याने केवळ १ लाख ९० हजार खर्च केला. त्याच्या या प्रयोगशीलतेचं आज सगळीकडे कौतुक होत आहे.
इस्रायली तंत्रज्ञानाची शिदोरी आणि नफ्याचं गणित
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातल्या सौंदाणे (Saundane) गावचे प्रगतिशील शेतकरी विजय बबन पवार (Vijay Baban Pawar) यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत अत्याधुनिक पद्धतीने डाळिंब लागवडीचा प्रयोग केला. त्यांनी इस्रायली ठिबक सिंचन प्रणाली, सेंद्रिय खतं, मधमाशी पालन आणि वेळेवर औषध फवारणी यासारख्या बाबींवर लक्ष केंद्रित केलं. या सगळ्याचा परिणाम म्हणजे केवळ पहिल्याच वर्षी त्यांनी प्रतिएकर ७ टन उत्पादन घेतलं आणि दर्जेदार डाळिंबासाठी प्रतिकिलो १२० रुपये असा उच्च दर मिळवला.
असं जुळलं गणित
डाळिंब लागवडीसाठी त्यांनी प्रति एकर ४०० रोपांची लागवड केली. त्यावर २० हजार रुपये खर्च आला. ठिबक सिंचनासाठी १ लाख, फवारणीवर ५० हजार आणि मजुरीवर २० हजार असा एकूण खर्च १ लाख ९० हजार झाला. त्यामध्येच ७ लाख ५० हजारांचं उत्पन्न मिळवून त्यांनी ५ लाख ६० हजारांचा निव्वळ नफा कमावला.
पवार यांनी शेंद्र्या (Shendrya) जातीच्या डाळिंबाची लागवड केली आहे. ही जात विशेषतः निर्यातीसाठी उपयुक्त समजली जाते आणि बाजारात चांगला दर मिळतो. विशेष म्हणजे त्यांच्या बागेतील डाळिंबाची गुणवत्ता पाहून व्यापारी थेट त्यांच्या शेतात येऊन माल घेऊन जात आहेत.
विजय पवार यांची ही यशोगाथा फक्त नाशिकसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरते. कमी खर्च, योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि सेंद्रियतेवर भर हे सूत्र आत्मसात केलं तर नक्कीच शेती नफा देणारी व्यवसाय ठरू शकते.