Nashik Crime : नाशिक(Nashik) जिल्ह्यातील सटाणा(Satana) भागातून पुन्हा एकदा अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. मालेगाव(Malegaon) तालुक्यातील डोंगराळे(Dongarale) गावातील 3 वर्षांच्या मुलीवरील अत्याचाराच्या घटनेवर अजूनही राज्यभरात संताप व्यक्त होत असताना, त्याच जिल्ह्यात आता 9 वर्षांच्या निरागस मुलीवर 75 वर्षीय नामदेव गुंजाळ(Namdev Gunjal) या पाशवी वृद्धाने घृणास्पद अत्याचार केल्याचं उघडकीस आलं आहे. पोलिसांनी संशयिताला तात्काळ ताब्यात घेतलं असून घटनेने संपूर्ण परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.चॉकलेट आणि पैशाचं आमिष; सहा महिन्यांपासून सुरू असलेलं शोषण
सटाणा(Satana) पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीत नमूद केल्यानुसार, संशयित नामदेव गुंजाळ(Namdev Gunjal) या नराधमाने सहा महिन्यांपासून पीडित बालिकेला पैसे, चॉकलेट आणि अन्य वस्तूंचं आमिष दाखवत एकट्या जागी नेऊन वारंवार अत्याचार केला. प्रकरण उघड झाल्यानंतर नागरिकांनी पोलिस ठाण्यावर एकच गर्दी केली. या कृत्यामुळे माणुसकीला काळीमा फासल्याची भावना लोकांमध्ये निर्माण झाली असून, आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी तीव्र झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
5 वर्षीय चिमुरडीवर अल्पवयीन मुलाकडून अत्याचार
दरम्यान, नाशिकसारखीच भयावह घटना भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे उघडकीस आल्याने संतापाची लाट आणखी वाढली आहे. घराशेजारी निरागसपणे खेळत असलेल्या 5 वर्षांच्या मुलीला एका 15 वर्षीय मुलाने मोबाईल दाखवण्याचे आमिष देत घरात नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला. घाबरलेल्या मुलीने धीर करून आई-वडिलांना सर्व सांगितल्यानंतर प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. लाखांदूर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
पालकांमध्ये भीतीचं सावट
नाशिक, भंडारा आणि परिसरातील इतर ग्रामीण भागात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना सलग घडत असल्याने पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुलींच्या सुरक्षेबाबत प्रशासनाने अधिक कठोर पावलं उचलण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. समाजात निर्माण झालेला संताप आणि दिलासा शोधणारे पालक दोन्हींची परिस्थिती पाहता, अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा देणं अत्यावश्यक असल्याचं जनमानसाचं मत आहे.






