Share

Nashik Crime: कौमार्य तपासणी, मासिक पाळीत नणंदेने स्वत:… नाशिकमध्ये विवाहितेसोबत भयानक घडलं, 7 पानी चिठ्ठी लिहून टोकाचं पाऊल

Nashik Crime: नाशिक (Nashik) येथील पंचवटी परिसरात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या पाच महिन्यांपूर्वी विवाह बंधनात अडकलेल्या नेहा संतोष पवार (Neha Santosh Pawar) हिने मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून आपलं जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे. मृत्यूपूर्वी तिने लिहून ठेवलेल्या सात पानी पत्रामध्ये तिने अनुभवलेल्या अमानवी वागणुकीचे अनेक गंभीर आरोप नमूद केले आहेत.

२६ नोव्हेंबरच्या दुपारी नेहाने टेलफोस नावाचे विषारी रसायन सेवन केले. प्रकृती बिघडल्याने तिला तत्काळ सदगुरू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

नेहा हिने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये सासू आणि नणंद यांच्यासह काही कुटुंबीयांकडून मिळालेल्या मानसिक छळाची सविस्तर माहिती होती. विवाहानंतरच्या केवळ पाच महिन्यांत तिने सहन केलेल्या अत्याचारांच्या घटना वाचून कोणाच्याही हृदयाला चटका बसेल.

नेहा हिने आपल्या पत्रात सांगितले आहे की विवाहानंतर तिच्या ‘कौमार्याबद्दल’ सासरच्यांना संशय आल्याने तिला अपमानजनक पद्धतीने तपासणीला भाग पाडण्यात आले. यामध्ये नवरा, सासू आणि नणंद यांच्या सहभागाचा उल्लेख तिने केला आहे. याहूनही धक्कादायक बाब म्हणजे मासिक पाळीदरम्यानही तिच्याशी अवमानकारक वर्तन झाले. नणंदेने सासूच्या सांगण्यावरून तिच्या पॅडची तपासणी केल्याचेही पत्रात लिहिले आहे.

नेहा हिच्या मते, माहेरी आल्यावर तिने ‘जादूटोणा करून आणला नसेल ना?’ या शंकेवरून तिच्या पर्सचीही सर्वांच्या उपस्थितीत तपासणी करण्यात आली. या सर्वामुळे ती मानसिकदृष्ट्या खचून गेल्याचे तिच्या लिखाणातून दिसते.

मयत नेहा हिचा भाऊ राहुल डावरे (Rahul Davare) यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर पंचवटी पोलिसांनी सासरकडील पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये हुंडाबळी, मानसिक छळ, मृत्यूस कारणीभूत ठरणे आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याची कलमे लावण्यात आली आहेत. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

 

 

 

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now