Naresh Mhaske : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकतेच एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना सर्वात जास्त ऊर्जा उद्धव ठाकरे यांनीच दिली आहे, असे सांगणारी लोकं आज ठाण्यात त्यांच्याच आसपास आहेत.
राऊत यांचे म्हणणे आहे की, ठाण्यातील काही लोकांनी उद्धव ठाकरेंना सांगितले होते की, “हा माणूस तुम्हाला धोका देईल, त्याची नियत चांगली नाही,” परंतु आज त्याच लोकांचे ठाण्यातील खासदार आणि आमदार म्हणून उपस्थित आहेत.
यावर ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. म्हस्के म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतल्यानंतर तुम्ही रोज मला फोन करत होते. तुम्ही मला सांगितले होते की, ‘एकनाथला सांग, मला नाईलाजाने त्यांच्यासोबत राहावे लागते, पण माझ्याबद्दल काही वाईट विचार ठेवू नको.’ विसरलात का?” असा सवाल त्यांनी संजय राऊत यांना केला. यावरच ते म्हणाले की, “तुम्ही बंद मूठ उघडली तर तुम्हालाच मोठं नुकसान होईल,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
नरेश म्हस्के यांनी पुढे सांगितले की, एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना फोन केला होता. त्यावेळी ठाकरेंनी त्यांना भेटायला येण्याची विनंती केली होती, पण शिंदे यांच्याबरोबर असल्यामुळे त्यांना त्या भेटीला नकार दिला होता. शिंदे साहेबांच्या निर्णयाशी आम्ही खंबीरपणे उभे राहिलो, असे म्हस्के म्हणाले.
याशिवाय, नरेश म्हस्के यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या अंतिम दिवसांमध्ये त्यांना किती त्रास दिला, हे सर्वांसमोर आणले. त्यांनी म्हटलं की, राज ठाकरे यांनी याबाबत अनेक वेळा बोलले आहे. बाळासाहेबांच्या सत्तेशी संबंधित काही घटनांवरही त्यांनी भाष्य केले. “आणि उद्धव ठाकरेंनी हेच केलं. त्यांनी आपले सख्खे भावांना दूर केलं आणि बाळासाहेबांच्या संपत्तीवर दावा केला. आजही ते शिवसेनेच्या दुष्मनांशी हातमिळवणी करत शिवसेनेला नुकसान करत आहेत,” असे नरेश म्हस्के यांनी थेट आरोप केले.