Nanded Crime: महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून गंभीर गुन्ह्यांची मालिका वाढत चालली आहे. राज्याच्या विविध भागांत खून, दरोडा, लैंगिक अत्याचार आणि इतर गुन्ह्यांचे प्रकार समोर येत असल्याने कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशातच नांदेड (Nanded) जिल्ह्यात एक थरकाप उडवणारी घटना घडली असून, त्याने परिसर हादरून गेला आहे.
इतरवार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवकाची अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मृत तरुणाचे नाव सक्षम तोटे (Saksham Tote) असून, त्याला प्रथम गोळ्या घातल्या आणि त्यानंतर दगडाने ठेचून मृतदेह निर्घृण अवस्थेत सोडण्यात आला. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही घटना नांदेड शहरातील मिलिंद नगर भागातील पैलवान टी हाऊसच्या मागील बाजूस घडल्याचे समजते. खून प्रकरणानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. मयत सक्षम तोटे आणि आरोपी एकमेकांना ओळखत होते, तसेच सर्वांचा गुन्हेगारी पार्श्वभूमीशी संबंध असल्याची चर्चा आहे. खुनामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादांमुळे ही हत्या घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुढील तपास पोलीस पथकांकडून सुरू आहे.