Nandani villagers boycott Jio network: कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी (Nandani Village) गावात गेल्या काही दिवसांपासून एकच चर्चा रंगली आहे, “आमचा हत्ती परत द्या, नाहीतर जिओ बंद करा!” महादेवी मठातील पाळीव हत्ती महादेवी (Mahadevi Elephant) हिला वनतारामध्ये हलवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कायम राहिल्यानंतर, ग्रामस्थांचा राग शमला नाही. पाच वर्षांपासून सुरू असलेला हा कायदेशीर संघर्ष हरल्यानंतर, गावकऱ्यांनी जिओ नेटवर्कवर थेट बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि ग्रामस्थांचा संताप
महादेवी हत्तीणीला वनताराकडे हलवण्याचा निर्णय घेतल्यानंतर पंचक्रोशीतील जैन समाजबांधव आणि नांदणीकरांनी जोरदार विरोध केला होता. मात्र, मठाधिपतींनी न्यायालयाच्या आदेशाचा मान राखत, हत्तीणीला सन्मानपूर्वक वनताराकडे रवाना केले. तरीही गावकऱ्यांच्या मनातील रोष कमी झाला नाही.
जिओवर बहिष्काराची सुरुवात
गावातील शेकडो नागरिकांनी आपली जिओ (Jio Network) सिम कार्ड्स पोर्ट करण्यास सुरुवात केली आहे. काहींचे 72 दिवसांचे, तर काहींचे काही महिन्यांचे रिचार्ज बाकी असूनही, “आमचा हत्ती परत द्या” या मागणीवर ठाम राहून सिम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
जिओ कस्टमर केअर प्रतिनिधींनी विचारणा केली “तुमचा पॅक शिल्लक आहे, मग का बंद करताय?” त्यावर ग्रामस्थ एकमुखाने उत्तर देत आहेत. “आमचा हत्ती परत आणा, मग पाहू.” काही जण तर थेट म्हणत आहेत. “तुमच्या मालकाला सांगा, आमचा हत्ती द्या!” हा संवाद सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
अंबानींच्या उत्पादनांवर संपूर्ण बहिष्काराचा इशारा
ग्रामस्थांनी केवळ जिओ नाही तर अंबानींच्या सर्व उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची तयारी दर्शवली आहे. सध्या हा मोहिमेचा पहिला टप्पा असून, नंतर याला व्यापक स्वरूप देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
ग्रामस्थांचा ठाम आरोप आहे की, महादेवी हत्तीणीला वनताराकडे हलवून त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे, “हत्ती परत येईपर्यंत जिओ सिम नको” हा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे.