Nana Patole: नाना पटोले यांनी घेतली भाजप नेत्याची भेट; राज्यभर मोठ्या राजकीय उलथापालथीची चर्चा सुरू

Nana Patole: नगरपालिका निवडणुका जाहीर होताच भाजप (Bharatiya Janata Party) पक्षात उमेदवारीवरून मोठा गोंधळ निर्माण झाला. काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचे तिकीट कापल्याने असंतोष उफाळून आला असून, अनेकांनी तर सरळ राजीनाम्याची धमकीच दिली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजपचे अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश सदस्य आबित सिद्दिकी (Abid Siddiqui) यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. प्रकृतीची विचारपूस हा या भेटीचा अधिकृत हेतू सांगितला जात असला तरी, या अचानक झालेल्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात मोठ्या हालचालींचा त्सुनामी उठल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

दरम्यान, या भेटीमुळे काँग्रेस व भाजपमधील राजकीय समीकरणे बदलू शकतात का, हा प्रश्न अनेकांच्या चर्चेचा प्रमुख मुद्दा बनला आहे. भाजपमध्ये उमेदवारीवरील नाराजी आणि काँग्रेसकडून सातत्याने करण्यात येणारी राजकीय खेळी या दोन्हींचा संगम या भेटीमुळे प्रकर्षाने जाणवू लागला आहे.

मुनगंटीवारांचे वक्तव्य 

चंद्रपूर जिल्ह्यातील मुल नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रतिष्ठेची लढाई सुरू आहे. त्यांच्या प्रचारसभेत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वातावरण आणखी तापले. त्यांनी म्हटले होते की, ज्या वॉर्डात काँग्रेसचा नगरसेवक जिंकेल, तिथेच बोर्ड लावून नागरिकांनी विकास काँग्रेसकडूनच मागावा, असा संदेश दिला जाईल.

यावर काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार एकता समर्थ यांनी प्रतिउत्तर देताना सांगितलं की, “मुनगंटीवार यांनी जनतेला धमकावलं. यातच आमचा विजय दडलेला आहे.” दुसरीकडे भाजपच्या उमेदवार प्रा. किरण कापगते यांनी मुनगंटीवार यांच्या विकासकामांमुळेच मूल शहर आजच्या स्थितीत आहे, आणि जनता नक्कीच भाजपला पाठिंबा देईल, असा विश्वास व्यक्त केला.

गेल्या दोन दिवसांत काँग्रेस–भाजप यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांनी ही लड़त अधिक तीव्र झाली असून, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे खिळले आहे.