Nagpur Crime : सावनेर शहरातल्या माळेगाव टाऊन परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. २९ वर्षीय महिला कबड्डीपटू किरण सूरज दाढे (वय २९, रा. माळेगाव टाऊन, ता. सावनेर) यांनी आपल्या जीवनाचा शेवट कीटकनाशक पिऊन केला. प्राथमिक तपासात समोर आले की, आर्थिक अडचणींमुळे आणि नोकरी मिळवण्याच्या आशेने लग्नाच्या नावाखाली झालेल्या फसवणुकीमुळे तिने हा टोकाचा निर्णय घेतला.
किरणचे शिक्षण सावनेरमधील डॉ. हरिभाऊ आदमने महाविद्यालयात बीएपर्यंत झाले असून, विद्यार्थीदशेत तिने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर कबड्डीमध्ये आपला जलवा दाखवला होता. उत्कृष्ट खेळाडू असूनही, नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात तिने सैन्य दल, पोलिस, होमगार्ड, डिफेन्स आणि अन्य सरकारी विभागांमध्ये प्रयत्न केले. मात्र अपेक्षित यश मिळाले नाही आणि घरची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट झाली.
घटनेच्या तपासात समोर आले की, एक तरुण स्वप्निल जयदेव लांबघरे (वय ३०, रा. पटकाखेडी, ता. सावनेर) यांनी किरणला नोकरी मिळवून देण्याचा प्रलोभन देऊन लग्न केले. नोकरीच्या आशेने लग्न केलेल्या किरणला काही दिवसांनी स्वप्निलच्या खोट्या आश्वासनांचा व फसवणुकीचा अंदाज आला. त्यानंतर स्वप्निलने मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. लग्नानंतर नोकरी देण्यास टाळाटाळ करणे, दबाव टाकून संबंध ठेवण्याची धमकी देणे, फोनवर शिवीगाळ करणे आणि घटस्फोटाची धमकी देणे यामुळे किरण अत्यंत मानसिक ताणाखाली आली.
अंततः गुरुवारी (दि. ४) सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास किरणने कीटकनाशक घेतले. कुटुंबीयांच्या लक्षात येताच तिला सावनेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर तिला नागपूरमधील मेडिकल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, जिथे उपचारादरम्यान रविवार रोजी तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी सावनेर पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कलम १०८ अंतर्गत गुन्हा दाखल करून फरार आरोपी स्वप्निलचा शोध सुरु केला आहे.
या हृदयद्रावक घटनेमुळे सावनेरमधील नागरिकांना मोठा धक्का बसला असून, लग्नाच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीविरुद्ध जनजागृतीची गरज अधोरेखित झाली आहे.





