Hadapsar : हडपसरमधील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ यांच्या खून प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रानुसार, वाघ यांच्या पत्नी मोहिनी आणि अक्षय जावळकर हेच मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे. मोहिनीच्या सांगण्यावरून अक्षयने पाच लाख रुपयांची सुपारी दिली होती आणि या कटाच्या अंमलबजावणीसाठी मारेकऱ्यांनी तीन वेळा पाळत ठेवून खून करण्याचा प्रयत्न केला होता.
९ डिसेंबरला अपहरण, नंतर निर्घृण हत्या
९ डिसेंबर २०२४ रोजी सतीश वाघ (वय ५८, रा. फुरसुंगी) मॉर्निंग वॉकला निघाले असताना आरोपींनी त्यांचे अपहरण केले. त्यानंतर शस्त्राने तब्बल ७२ वार करून त्यांची हत्या करण्यात आली आणि मृतदेह उरुळी कांचन परिसरातील शिंदवणे घाटात फेकण्यात आला.
अनैतिक संबंध आणि मालमत्तेचा कट
तपासानुसार, २०१३ पासून अक्षय आणि मोहिनीच्या अनैतिक संबंधांची सुरुवात झाली. सतीश वाघ यांना संशय आल्याने त्यांनी पत्नीच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध आणले. यामुळे मोहिनी आणि अक्षयने मिळून त्यांचा काटा काढण्याचा कट रचला.
जादूटोण्याचाही वापर
आरोपपत्रात नमूद केल्याप्रमाणे, मोहिनीने एका मांत्रिकाची भेट घेऊन वाघ यांच्यावर जादूटोणा करण्यास सांगितले होते. मात्र, तो उपाय यशस्वी न झाल्याने तिने थेट सुपारी देऊन हत्या करण्याचा निर्णय घेतला.
सुपारी खूनासाठी आर्थिक व्यवहार
पोलिस तपासात असेही समोर आले आहे की, अक्षय जावळकरने पवन शर्मा याच्या बँक खात्यात दीड लाख रुपये ऑनलाइन पाठविले. खून केल्यानंतर शर्माच्या वाघोलीतील घरी जाऊन उर्वरित रक्कम देण्यात आली.
गुन्हे शाखेने न्यायालयात १,००० पानांचे आरोपपत्र सादर
या प्रकरणात हडपसर पोलिसांनी मोहिनी वाघ, अक्षय जावळकर, पवन शर्मा, अतिश जाधव, नवनाथ गुरसाळे आणि विकास शिंदे यांना अटक केली आहे. गुन्हे शाखेने एक हजार पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले असून, त्यातून अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, न्यायालयीन कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.