Murli Naik : जम्मू-कश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या भीषण संघर्षादरम्यान, भारताच्या मातीचा एक शूर सुपुत्र, जवान मुरली श्रीराम नाईक (वय 23) शहीद झाला आहे. गुरुवारी, 09 मे रोजी पहाटे 3.30 वाजता पाकिस्तानी सैन्याच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना त्यांनी वीरमरण पत्करले.
मुरली नाईक हे मूळचे आंध्र प्रदेशातील सत्यसाई जिल्ह्यातील कल्की तांडा, गोरंटला मंडळातील रहिवासी आहेत. त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत सामान्य. त्यांचे वडील श्रीराम नाईक मजुरी करून मुंबईच्या घाटकोपर परिसरात कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांनी आपल्या मुलाला शिक्षणाची सोय करून भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी प्रेरित केले.
मुरली नाईक यांची 2022 मध्ये भारतीय सैन्यात भरती झाली होती. नाशिकच्या देवळाली येथे त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर आसाम आणि पंजाब येथे पोस्टिंग झाल्यानंतर सध्या ते जम्मू-कश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये देशसेवेत कार्यरत होते. दुर्दैवाने, भारत-पाक संघर्षात त्यांना शौर्याचा अंतिम साक्षात्कार लाभला.
त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी, घाटकोपरच्या कामराज नगर भागात शोककळा पसरली. आई ज्योती नाईक आणि वडील श्रीराम नाईक यांचा शोक अनावर झाला. शेजारी, मित्रमंडळी आणि परिसरातील लोकांनी कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत अश्रूंनी श्रद्धांजली वाहिली.
मुरली नाईक सध्या आपल्या मूळ गावी आंध्र प्रदेशात यात्रेसाठी गेले होते. त्यामुळे त्यांचे पार्थिव शरीर अंत्यविधीकरिता 10 मे रोजी सायंकाळी त्यांच्या गावात आणले जाणार आहे. याबाबतची माहिती थलसेना कार्यालय, पंजाब येथून देण्यात आली असून स्थानिक पोलीस प्रशासन संपर्कात आहे.
या दुःखद घटनेनंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ट्विटरवरून मुरली नाईक यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. तसेच, मुंबईतील पंतनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश केवळे यांनीही त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी प्रार्थना केली आहे.
देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या मुरली नाईक यांच्या शौर्याला संपूर्ण देश कृतज्ञतेने नमन करत आहे. त्यांच्या बलिदानाचे स्मरण सदैव काळजावर कोरले जाईल.
mumbais-murli-naik-martyred-in-uri-while-fighting-with-pakistan-army