Mumbai : वसईत (Vasai Mumbai) घडलेली घटना फक्त पोलिस कारवाईचा विषय नाही, तर संपूर्ण समाजाला हादरवून टाकणारा आणि लाजविणारा प्रसंग आहे. मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या (Mira Bhayandar-Vasai Virar Police) मानवी तस्करीविरोधी पथकाने, एक्सोडस रोड इंडिया फाउंडेशन (Exodus Road India Foundation) आणि हार्मोनी फाउंडेशन (Harmony Foundation) यांच्या मदतीने 26 जुलै रोजी नायगाव (Naigaon Vasai) येथे मोठी मोहीम राबवून एक 12 वर्षीय बांगलादेशी मुलगी नरकयात्रेतून मुक्त केली.
सुटकेनंतर त्या मुलीने सांगितलेली हकिकत कोणाच्याही अंगावर काटा आणणारी होती. केवळ तीन महिन्यांत 200 हून अधिक नराधमांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते.
एका विषयात नापास झाल्याने आयुष्य उद्ध्वस्त
एक्सोडस रोड इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष श्याम कांबळे (Shyam Kamble) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी शाळकरी होती. एका विषयात नापास झाल्याने आई-वडिलांचा राग आणि मार सहन करावा लागू नये म्हणून ती घराबाहेर पडली. याच संधीचा गैरफायदा घेत ओळखीच्या एका महिलेने तिला कलकत्ता (Kolkata) येथे नेले.
तिथे तिची बनावट कागदपत्रे तयार करून गुजरातच्या नाडियाड (Nadiad Gujarat) येथे विकले. तिथल्या एका वृद्धाने तिच्यावर प्रथम अत्याचार केले, तिचे अश्लील फोटो काढून तिला ब्लॅकमेल केले आणि नंतर देहव्यापाराच्या दलदलीत ढकलले.
मुंबईतील नरकवास
यानंतर तिला मुंबईत आणून वेगवेगळ्या ठिकाणी नराधमांच्या हवाली करण्यात आले. अद्याप किशोरावस्थेतही न पोहोचलेल्या त्या निरागस मुलीचे बालपण पैशासाठी विकले जात होते. ही फक्त तिचीच कथा नाही, तर अनेक मुलींचे हेच वास्तव आहे.
आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
नायगाव पोलिसांनी आतापर्यंत दोन महिला आणि सात पुरुष दलालांना अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून, सर्वांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी एनजीओकडून होत आहे.