Mumbai Heavy Rain: पहाटेपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने आज मुंबईकरांचे हाल झाले आहेत. आकाशात दाट काळे ढग जमल्याने शहरभर अंधार पसरला आहे. मुसळधार पावसामुळे दृश्यमानता कमी झाली असून, हवामान खात्याने मुंबईसाठी पुढील तीन तास महत्त्वाचे असल्याचे सांगत रेड अलर्ट दिला आहे.
पावसाचा जोर कायम राहिल्यास रस्त्यांवर पाणी साचून वाहतुकीचा वेग ठप्प होण्याची शक्यता आहे. विशेषतः कामकाजाच्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चाकरमान्यांना कार्यालय गाठताना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
दक्षिण मुंबईतील (South Mumbai) हिंदमाता, किंग्ज सर्कल, दादर, फाईव्ह गार्डन, स्वामीनारायण मंदिर, जे.जे. फ्लायओव्हर आणि माटुंगा परिसर हे पाण्याखाली गेले आहेत. अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने वाहनांचे नुकसान झाले आहे. शिवाय अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल ट्रेन (Mumbai Local) सेवा देखील विस्कळीत झाली आहे. सध्या मध्य रेल्वे मार्गावर लोकल 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत, तर हार्बर मार्गावरील गाड्याही पाच ते दहा मिनिटांच्या उशिराने ये-जा करत आहेत. पश्चिम रेल्वेची वाहतूक तुलनेने सुरळीत आहे. मात्र, माटुंगा स्थानकात पाणी साचल्याने ट्रॅकवरून गाड्यांचा वेग मंदावला आहे.
जे.जे. फ्लायओव्हरवर पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना अडचण येत आहे. पूनम चेंबर-वरळी उत्तर वाहिनी भागात पाणी दीड फूटापर्यंत साचल्याने वाहतूक बंद करून ती कोस्टल रोड सी फेस मार्गे वळवण्यात आली आहे.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे मुंबईतील मोनोरेल (Mumbai Monorail) वडाळा स्थानकाजवळ तांत्रिक बिघाडामुळे काही वेळ ठप्प झाली होती. पाण्याचा निचरा करण्यासाठी महानगरपालिकेकडून पंप लावून पाणी उपसा सुरू आहे.
मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये धुक्याचे प्रमाण वाढल्याने रस्त्यांवरील दृश्यमानता आणखी कमी झाली आहे. याचा थेट फटका रस्ते वाहतुकीला बसत असून, अनेक ठिकाणी मोठी कोंडी झाल्याचे दिसून आले.






