पुणे तिथे काय उणे! कमी खर्च अन् धुमधडाक्यात लग्न, पहा ट्रकवरील फिरतं मंगल कार्यालय

पुणे | गेल्या काही वर्षांपासून मोकळ्या मैदानात मंडप बांधून विवाह सोहळा करण्याची पद्धत जवळपास बंदच झाली आहे. आता मोठ-मोठ्या मंगल कार्यालयात लग्न करण्याची रितच झाली आहे. अशात एका पुणेकराने भन्नाट शक्कल लढवली आहे. त्याने चक्क चालते फिरते मंगल कार्यालय तयार केले आहे.

चालत्या फिरत्या मंगल कार्यालयाची शहर आणि परिसरात जोरदार चर्चा आहे. अनेक सर्वसामान्य व्यक्तींना महागडे वेडिंग हॉल किंवा कार्यालयांची भाडे परवडत नाही. अशा लोकांसाठी हे कार्यालय स्वस्तात मस्त पर्याय ठरु शकणार आहे.

अलिशान असलेल्या या चालत्या फिरत्या मंगल कार्यालयातील सुविधा पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. एका मोठ्या ट्रकवर उभारलेल्या कार्यालयात लग्न सोहळ्यासाठी वातानुकूलित प्रशस्त हॉल आहे. तसेच आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. याशिवाय अनेक सोई आणि सुविधा या फिरत्या मंगल कार्यालयात उपलब्ध केल्या गेल्या आहेत.

फिरत्या कार्यालयाची भन्नाट कल्पना पिंपरी-चिंचवड शहरातील दयानंद दरेकर या मंडप व्यावसायिकाला सुचली. त्यांनी सर्वसामान्य व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून अशी अनोखी शक्कल लढवली आहे. फिरते मंगल कार्यालय खर्चिक असणाऱ्या वेडिंग हॉल किंवा हॉटेलला पर्याय ठरू शकते, असे दरेकर यांचे मत आहे.

फिरत्या मंगल कार्यालयाच्या हॉलमध्ये वाढदिवस, मुंज, लग्नसोहळा, रिसेप्शन, सांस्कृतिक कार्यक्रम करता येतील असे दरेकर यांनी म्हटले आहे. दरेकर यांना हे ट्रकवरील कार्यालय बनवण्यासाठी ५० लाख रुपयांचा खर्च आला आहे. त्याचे हे कार्यालय कार्यक्रमासाठी ५० हजार रुपयांमध्ये उपलब्ध होणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले आहे.

फिरत्या मंगल कार्यालयासोबत आचारी, बँड, ब्राम्हण, केटरर्स असे पॅकेज देण्यात येत आहे. दरेकर यांच्या या फिरत्या कार्यालयाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्राहकांना हवे त्या ठिकाणी कार्यालय येत असल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.