Independence Day 2025: स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आज देशामधील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लाल किल्ल्यावरून (Lal Killa) जनतेला संबोधित करताना एक अशी योजना जाहीर केली ज्यामुळे आपल्या देशातील लाखो युवकांच्या स्वप्नांना नवी उभारी मिळू शकते. “मला गरिबी म्हणजे काय ते माहिती आहे, म्हणूनच सरकार कागदावर मर्यादित न राहता थेट लोकांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी सक्रिय असायला हवे,” असं सांगत त्यांनी देशातील तरुणांसाठी प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना सुरू करण्याची घोषणा केली.
या योजनेअंतर्गत केंद्र सरकार (Central Government) तब्बल १ लाख कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. विशेष म्हणजे खासगी क्षेत्रामध्ये पहिली नोकरी मिळालेल्या तरुणांना दरमहा १५,००० रुपये सरकारकडून दिले जाणार आहेत. या माध्यमातून जवळपास ३.५ कोटी तरुणांसाठी नव्या रोजगार संधी निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या योजनेची अंमलबजावणी आजपासून म्हणजेच १५ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होत आहे.
मोदी म्हणाले की, गेल्या काही वर्षांत देशामध्ये स्टार्टअप्सची झेप लक्षणीय प्रमाणात वाढली आहे आणि त्यातून लाखो युवकांना दिशा मिळाली आहे. “आता फक्त नोकरी मिळणं एवढ्यापुरते आपण सीमित राहू नये; तरुणांनी स्वतःचे प्लॅटफॉर्म तयार करावेत आणि देश आत्मनिर्भर होण्यासाठी पुढाकार घ्यावा,” असे आवाहन त्यांनी केले.
त्याचबरोबर भाजप सरकारने (BJP Government) शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या योजनांसह लखपती दीदी योजना आणि पीएम स्वानिधी योजना यांचा उल्लेखही यावेळी केला. दिवाळीपर्यंत नागरिकांसाठी नवीन जीएसटी सुधारणा आणली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले असून, “या सुधारित प्रणालीमुळे सामान्य नागरिकांच्या कराचा भार कमी होईल आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तू स्वस्त होतील,” असे स्पष्ट केले. त्यासाठी केंद्र सरकारने आधीच उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.
अखेर देशवासियांना उद्देशून मोदी म्हणाले, “आपल्याला प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर व्हायचे आहे. खतांच्या बाबतीतही आपण आता इतरांवर अवलंबून राहू शकत नाही. येत्या काळात ईव्ही बॅटरीच्या (EV Battery) क्षेत्रातही आपल्याच तरुणांची कामगिरी जगासमोर उदयास येईल, यावर माझा पूर्ण विश्वास आहे.”