“७ वर्षात मोदींनी कधी माघार घेतली नाही पण आता पराभवाच्या भितीने कृषी कायदे मागे घेतले”

मुंबई । आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृषीविषयक तीनही कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा मोठा विजय झाला आहे. आज ते देशाला संबोधित करत आहेत. त्यादरम्यान मोदींनी ही घोषणा केली. या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी घरी परतण्याचे आवाहन केले आहे. अनेक दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत होते.

यावर आता अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री नवाब मलिक यांनी हा शेतकऱ्यांचा आणि शेतकरी आंदोलनाचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली. दिल्लीतील या आंदोलनात शेतकऱ्यांनी जीवाची बाजी लावली. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता शेतकऱ्यांनी वर्षभरापासून आपलं आंदोलन सुरूच ठेवले.

या आंदोलनात लोकांनी प्राणाची आहुती दिली, शेतकरी मागे हटले नाही. शेवटी सरकारला कायदा रद्द करावा लागला. 7 वर्षांत मोदींनी कधीही पाय मागे घेतला नाही. आता, पंजाब आणि उत्तर प्रदेशातील निवडणुका समोर आहेत. त्यामुळेच, पराभवाच्या भीतीने मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, हे तीन कायदे मागे घेण्यासाठी शेतकरी संघटनांनी बराच काळ आंदोलन केले होते. या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनादरम्यान तीनही वादग्रस्त कायदे संसदेद्वारे मागे घेतले जातील. मोदींनी शेतकऱ्यांना शेतात परत जाण्याचे आवाहनही केले आहे.

आज सरकारने कृषी क्षेत्राशी संबंधित आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. झिरो बजेट शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी, देशाच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन शास्त्रोक्त पद्धतीने पीक पद्धतीत बदल करणे. एमएसपी अधिक प्रभावी करण्यासाठी, भविष्याचा विचार करून अशा सर्व विषयांवर निर्णय घेण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल.

यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ, कृषी अर्थतज्ज्ञ यांचे प्रतिनिधी असतील, अशीही माहिती त्यांनी दिली आहे. मोदी माफी मागत म्हणाले की, आमचे प्रयत्न कमी पडले असावेत की आम्ही त्यांचे स्पष्टीकरण देऊ शकलो नाही, हा शेतकऱ्यांचा मोठा विजय आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.