काही दिवसांपूर्वी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर पक्षाचा गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. ‘तुम्ही मशिदीवरील भोंगे नाही उतरवलेत तर आम्ही भोंगे लावून हनुमान चालिसा सुरु करु’, असं विधान राज ठाकरे यांनी केलं होतं. राज ठाकरेंची(Raj Thakre) ही भूमिका पक्षातील काही लोकांना पटली नव्हती.(mns worker maruti donge post on facebook )
पुण्यातील मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी देखील राज ठाकरेंच्या मशिदींवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यावर नाराजी दर्शविली होती. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मराठीचा मुद्दा सोडून हिंदुत्वाच्या मुद्द्याची वाट धरली आहे, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. यादरम्यान मनसे पक्षाच्या एका कार्यकर्त्याने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या कार्यकर्त्याचे नाव मारुती डुंगे असं आहे.
‘मग राजसाहेबांनी काय चूक केली?’, असे शीर्षक देत मनसे सैनिकाने पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेजवर शेअर केली आहे. यामध्ये त्या मनसे कार्यकर्त्याने लिहिले आहे की, “यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभांनाही गर्दी होणार असून पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवारही निवडून येतील, कारण लोकांना काय हवे आहे? हे राजसाहेब ठाकरे यांना चांगलेच कळले आहे.”
https://www.facebook.com/407529622782440/posts/2060159607519425/?d=n
मनसे कार्यकर्त्याने पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, “राजसाहेबांनी जगातील विविध देशांतील चांगल्या गोष्टींचा अभ्यास करून ‘महाराष्ट्राचा विकास आराखडा’ तयार केला आहे. या विकास आराखड्यात राज्याचा विकास कसा झाला पाहिजे, याबद्दल मार्गदर्शन केलं आहे. पण खरे सांगा तुमच्यापैकी किती जणांनी हा विकास आराखडा वाचला आहे?”, असा सवाल मनसे कार्यकर्त्याने केला आहे.
“इथल्या लोकांना निवडणुकीत बॉयलर कोंबडी, दारू आणि दोन-पाच हजार रुपये दिले की मते मिळतात. महाराष्ट्रात सुशिक्षित उमेदवारांना जनता स्थान देत नाही. महाराष्ट्राच्या निवडणुकीत सुशिक्षित उमेदवारांना खेळण्यासारखे पाहिले जाते. इथे राजकरणात देखील कुटूंब पहिले जाते. पण मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे हे देशातील एकमेव राजकारणी आहेत, ज्यांनी उमेदवारांची जात न पाहता, कोणत्याही कुटुंबाकडे न पाहता सामान्य सामान्य कुटुंबातील स्वच्छ प्रतिमेच्या युवक-युवतींना पक्षात स्थान दिले आहे” असे मनसे कार्यकर्त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
हिंदुत्वाच्या मुद्याबाबत मनसे कार्यकर्त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे की, “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेला हिंदूत्वाचा मुद्दा विरोधकांच्या मनात घर करून असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. इतके दिवस झोपलेले सगळे विरोधक पाडव्याच्या मेळाव्यानंतर जागे झाले आहेत. जोपर्यंत राजसाहेब बेंबीच्या देठापासून महाराष्ट्राच्या भल्यासाठी ओरडत होते, तोपर्यंत त्यांना कोणीही गांभीर्याने घेतले नाही.”
“पण जेव्हापासून त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला, तेव्हापासून देशभरातील राजकारण्यांनी राजसाहेब ठाकरे यांना गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली आहे. नाशिक महापालिकेच्या तिजोरीवर कोणताही भार न टाकता राजसाहेबांनी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून नाशिक शहराचा कायापालट केला, तरीही तेथील जनतेने महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला साथ दिली नाही. एवढे सगळे करूनही जनता साथ देत नाही, मग धर्माने हिंदू असलेल्या राजसाहेबांनी हिंदुत्व हाती घेतले तर त्यात गैर काय?”, असा सवाल मनसे कार्यकर्त्याने महाराष्ट्रातील जनतेला विचारला आहे.
“मला जनतेला एकच सांगायचे आहे, आपण राजसाहेब ठाकरेंसारख्या नेत्याच्या मागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. हिंदुत्व हाती घेतले तरी पक्षाचा पाठिंबा विकासासाठी आहे. याउलट आता हिंदुत्व आणि विकास असे सुंदर समीकरण तयार झाले आहे, त्यामुळे योग्य पक्षाला मत देण्याची ही सुंदर संधी तुम्हाला मिळाली आहे, ही संधी साधता आली तर बरे, नाहीतर “ये रे माझा मागेला!”, असे मनसे कार्यकर्त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट, पीडित तरुणीने चित्रा वाघांवरच केले गंभीर आरोप, म्हणाली…
सोमय्यांना सलग दुसरा दणका, मुलाचा जामीन अर्जही फेटाळला; दोघही पितापुत्रा गजाआड जाणार
बलात्कार पिडीत तरुणीवर चित्रा वाघ भडकल्या; म्हणतात, मला तर काहीच समजत नाहीये…