MNS Marathi Morcha in Mira bhayandar: मीरा भाईंदर (Mira Bhayandar) परिसरात मराठी भाषेच्या सन्मानासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना (Shiv Sena) आणि मराठी एकीकरण समिती (Marathi Ekikaran Samiti) यांच्या वतीने नियोजित मोर्चाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली होती. त्यामुळे परिसरातील वातावरण चिघळले होते.
काल रात्रीपासूनच पोलिसांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. पोलिसांनी कलम 144 लागू करून बालाजी हॉटेल (Balaji Hotel) परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता.
आंदोलक आक्रमक, पोलिसांची धांदल
आज सकाळी नियोजित वेळेनुसार सकाळी 10 वाजता बालाजी हॉटेल चौकात कार्यकर्ते एकत्र येऊ लागले. पोलिसांनी जोरदार धरपकड सुरू केल्याने राडा निर्माण झाला. आंदोलकांना पकडण्यासाठी आणलेल्या बेस्ट (BEST) बस गाड्या भरून गेल्या. त्यानंतर काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी रिक्षातून पोलीस ठाण्यात नेलं. इतकंच नव्हे तर ठाण्यात जागा नसल्यामुळे काही आंदोलकांना बँक्वेट हॉलमध्ये ठेवण्यात आलं.
पोलिसांनी सुरुवातीला मोर्चाला परवानगी नाकारली होती. मात्र आंदोलनाला मोठं समर्थन मिळाल्याने आणि दबाव वाढल्याने पोलिसांनी अखेर मोर्चाला अंशतः परवानगी दिली. तथापि, ठरलेल्या मार्गात काहीसा बदल करण्यात आला.
मोर्चा बालाजी हॉटेल ते मीरा रोड स्टेशन (Mira Road Station) या मार्गावरून निघाला आहे. मोर्चामध्ये मनसे नेते अभिजित पानसे (Abhijit Panse), ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि मराठी एकीकरण समितीचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
मोर्चा जेव्हा शांतीनगर (Shantinagar) परिसरात पोहोचला, जेथे प्रामुख्याने जैन (Jain) आणि गुजराती (Gujarati) लोकवस्ती आहे, तेव्हा पोलिसांनी स्वामी विवेकानंद रोड (Swami Vivekanand Road) येथे मोर्चा रोखला. यानंतर आंदोलक अधिक आक्रमक झाले व “आम्हाला पुढे जाऊ दिलं नाही तर ठिय्या आंदोलन करणार” अशी ठाम भूमिका घेतली.
हा मोर्चा अखेर शहीद मेजर कौस्तुभ राणे (Shaheed Major Kaustubh Rane) यांच्या स्मारकाजवळ (जवळ मीरा रोड स्टेशन) समाप्त होणार असल्याचे सूत्रांकडून कळते.