Share

तत्वासाठी सत्तेला लाथ मारणारे बाळासाहेब कुठे अन् राज्यसभेसाठी MIM च्या दाढ्या कुरवळणारे कुठे; मनसेचा शिवसेनेला टोला

raj thakre & uddhav thakre

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी शिवसेना पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेचे मोठे नेते या सभेसाठी औरंगाबादमध्ये(Aurangabaad) दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेला लाखो लोक जमतील, असा दावा शिवसेना नेत्यांनी केला आहे. (mns lsandip deshpande tweet about shivsena )

संभाजी नगर मध्ये आज तोफ धडाडणार आहे, असे शिवसेनेचे नेते म्हणत आहेत. या सभेसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या सभेसाठी दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे, अशी माहिती औरंगाबाद जिल्ह्याचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिली आहे. औरंगाबादमधील सभेवरून मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत शिवसेनेवर टीका केली आहे. “तत्वासाठी सत्तेला लाथ मारणारे मा. बाळासाहेब कुठे आणि एका राज्यसभेच्या जागेसाठी एमआयएम आणि समाजवादीच्या दाढ्या कुरवळणारे आमचे नंबर वन कुठे. असो आज संभाजी नगर मध्ये तोफ धडाडणार असं म्हणतात. लवंगी वाजली तरी पुरे”, अशा शब्दांत ट्विट करत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

सध्या राज्यसभेच्या निवडणुकीवरून वातावरण तापलं आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी १० जूनला निवडणूक होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत होणारा घोडेबाजार थांबविण्यासाठी शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना मुंबईतील एका हॉटेलमध्ये थांबवले आहे. शिवसेनेकडून राज्यसभेला संजय राऊत आणि संजय पवार यांना संधी देण्यात आली आहे.

राज्यात राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. सहाव्या उमेदवाराच्या विजयासाठी भाजपा तसेच महाविकास आघाडीचे बडे नेते छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांचे मन वळवण्याचे प्रयत्न करताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला आहे.

त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा झटका बसला आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी दाखल केलेल्या अर्जाला ईडीनं विरोध केला आहे. कैद्यांना मतदानाचा अधिकार नाही, असं ईडीने स्पष्ट केलं आहे. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये सभा आहे. या सभेत उद्धव ठाकरे कोणावर निशाणा साधणार? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now