MNS Leader Ameya Khopkar Warns Comedian Kapil Sharma: महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी सुप्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) यांना इशारा दिला आहे की, त्यांच्या शोमध्ये (The Kapil Sharma Show) ‘बॉम्बे’ असा उल्लेख करणे चुकीचे आहे; अधिकृत नाव आता ‘मुंबई’ आहे.
खोपकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून म्हटले आहे की, “बॉम्बेचं मुंबई नामकरण 30 वर्षांपूर्वी झाले तरी बॉलिवूड आणि टीव्ही उद्योगात अजूनही बॉम्बे या नावाचा वापर होत आहे. विशेषतः ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सेलिब्रिटी गेस्ट, दिल्लीतील राज्यसभा खासदार आणि शो अँकरसह अनेक हिंदी चित्रपटात बॉम्बे असा उल्लेख आहे. 1995 मध्ये महाराष्ट्र शासन आणि 1996 मध्ये केंद्र शासनाची मान्यता मिळाल्यानंतर मुंबई हे अधिकृत नाव आहे. तरी याचा सन्मान राखून मुंबई असेच उल्लेख करावा,” असे त्यांनी म्हटले.
कोणत्या एपिसोडवर टीका?
अमेय खोपकर यांनी त्यांच्या पोस्टसोबत हुमा कुरेशी (Huma Qureshi), साकिब सलीम (Saqib Saleem), शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty), शमिता शेट्टी (Shamita Shetty) यांच्या एका एपिसोडची क्लिप शेअर केली आहे. या क्लिपमध्ये हुमा कुरेशी मुंबईत आल्यानंतरच्या संघर्षाचा अनुभव सांगताना ‘बॉम्बे’ असा उल्लेख करते, ज्यावर मनसेने टीका केली आहे.
कपिल शर्मा टीमकडून काय प्रतिक्रिया?
अमेय खोपकरांच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर नव्या वादाला सुरुवात झाली आहे. अद्याप कपिल शर्मा आणि त्यांच्या टीमकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. आता साऱ्यांचे लक्ष आहे की, टीव्ही आणि बॉलिवूडमधील स्टार्स या मुद्द्यावर कशी प्रतिक्रिया देतील.
मनसेच्या या इशाऱ्यामुळे हा वाद मुंबई महानगरपालिका निवडणुकांशी जोडला जात आहे. त्यामुळे या विषयावर आणखी चर्चेचा वाद निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे, आणि सोशल मीडियावर या विषयाचे वेगवेगळे पडसाद उमटले आहेत.