जीम व्यावसायिकांसाठी मनसे मैदानात; जीम सुरू करा नाहीतर…

पुणे | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या ५ महिन्यापासून राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तेव्हापासून संपूर्ण राज्यातील जीम व्यवसाय बंद करण्यात आले आहे.

त्यामुळे जीम व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लवकरात लवकर जीम व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी. असे निवेदन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मनसेने केले आहे.

तसेच, जीम व्यवसाय सुरू करण्याबाबत लवकरात लवकर तोडगा निघाला नाही, तर जीम चालकांसह आम्ही आंदोलन करू. असा इशारा मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिला आहे.

नियम व अटींसह अनेक व्यवसाय सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे जीम व्यवसाय सुरू करण्यासाठीही परवानगी द्यावी, अशी मागणी मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून जीम व्यावसायिकांनी अगदी संयमाने सरकारी नियमांचे पालन केले आहे. दरम्यान अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र यातही जीम व्यावसायिकांच्या पदरी निराशाच पडली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी व्यायाम तितकाच आवश्यक आहे. त्यासाठी जीम चालू असणे गरजेचे आहे, अशा शब्दात मनसेने जीम व्यावसायिकांची व्यथा मांडली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.