Share

Mirabai Chanu News : मीराबाई चानूने पुन्हा वाजवला जागतिक विजयाचा नगारा, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकून भारताचा झेंडा

Mirabai Chanu News : भारतीय खेळाडू मीराबाई चानू (Mirabai Chanu) हिने पुन्हा एकदा जगाला आपलं कौशल्य दाखवत वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 (World Weightlifting Championships 2025) मध्ये रौप्यपदक जिंकून भारताचा झेंडा उंचावला आहे. नॉर्वेतील फोर्डे (Forde Norway) शहरात सुरू असलेल्या या स्पर्धेत तिचं हे तिसरं विश्वस्तरीय पदक ठरलं आहे.

या आधी 2017 मध्ये अमेरिकेतील अॅनाहाइम (Anaheim USA) येथे तिने 48 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं होतं. तसेच 2022 मध्ये कोलंबियाच्या बोगोटा (Bogota Colombia) शहरात 49 किलो वजनी गटात तिने रौप्य पदक मिळवलं होतं. त्यामुळे भारतीय वेटलिफ्टिंगच्या इतिहासात दोनपेक्षा अधिक विश्वचषक पदकं जिंकणाऱ्या ती तिसरी महिला ठरली आहे.

या वर्षीच्या स्पर्धेत मीराबाईने एकूण 199 किलो वजन उचलत दुसरे स्थान मिळवले. स्नॅचमध्ये 84 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 115 किलो असा तिचा आकडा राहिला. उत्तर कोरियाच्या री सांग गुम (Ri Sang Gum) हिने तब्बल 213 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावलं. दुसरीकडे चीनच्या थान्याथन (Thanyathan China) हिने कांस्यपदक मिळवलं. स्नॅच फेरीत थान्याथन मीराबाईपेक्षा 4 किलो आघाडीवर होती, मात्र क्लीन अँड जर्कमध्ये मीराबाईने अप्रतिम ताकद दाखवत फक्त 1 किलोच्या फरकाने तिला मागे टाकत रौप्यपदक निश्चित केलं.

या रोमांचक विजयाच्या क्षणी मीराबाईने थेट आपल्या प्रशिक्षक विजय शर्मा (Vijay Sharma) यांच्याकडे धाव घेतली आणि त्यांचे आभार मानले. गेल्या काही वर्षांत झालेल्या दुखापतींमुळे तिच्यासाठी करिअर कठीण झालं होतं, मात्र या अडचणींवर मात करत तिने पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. नुकत्याच अहमदाबादमध्ये (Ahmedabad India) झालेल्या कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून तिने पुनरागमनाची गडगडाटी सुरुवात केली होती.

मीराबाई चानू ही अशी तिसरी भारतीय खेळाडू ठरली आहे जिने दोनपेक्षा अधिक वेळा वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये पदकं जिंकली आहेत. तिच्याआधी कुंजरानी देवी (Kunjarani Devi) आणि कर्णम मल्लेश्वरी (Karnam Malleswari) यांनी हे यश मिळवलं होतं. कुंजरानी देवीने 1989 ते 1997 दरम्यान तब्बल सात वेळा रौप्य पदकं जिंकली होती, तर कर्णम मल्लेश्वरीने दोन सुवर्ण आणि दोन कांस्य पदकं जिंकून भारतीय वेटलिफ्टिंगच्या इतिहासात आपलं नाव अमर केलं आहे.

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now