Share

Mira Bhayandar : भाईंदरमध्ये काल अमराठी व्यापाऱ्यांचा मोर्चा, आता ‘मराठी माणूस’ एकवटला, घेतला मोठा निर्णय

Mira Bhayandar :  मीरारोड (Mira Road) परिसरात मराठी भाषा न बोलल्याने सुरू झालेल्या वादाला आता सामाजिक आणि राजकीय वळण मिळालं आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) कार्यकर्ते जोधपूर स्वीट्स अँड नमकीन (Jodhpur Sweets and Namkeen) या दुकानात गेले आणि तिथल्या अमराठी व्यापाऱ्याला “मराठी भाषा का बोलावी?” या प्रश्नावरून कानशिलात लगावली. त्यानंतर अमराठी व्यापाऱ्यांनी संघटित होत दुकाने बंद ठेवून निषेध मोर्चा काढला.

या मोर्च्यानंतर आता मराठी समाजानेही प्रतिक्रिया दिली असून, आज संध्याकाळी 6 वाजता सर्व मराठी संघटना, राजकीय पक्षांतील मराठी पदाधिकारी आणि नागरिक एकत्र येऊन पोलीस उपायुक्त (Deputy Commissioner of Police) यांची भेट घेणार आहेत.

मराठी जनतेत तीव्र असंतोष

शहरात मराठी भाषेला दुय्यम स्थान, मराठी व्यक्तींना घर भाड्याने किंवा विक्रीस न देण्याचे प्रकार, तसेच विशिष्ट समाजाच्या समर्थनार्थ मराठींच्या विरोधात दबाव निर्माण करण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. यामुळे मीरा-भाईंदर (Mira-Bhayandar) परिसरातील मराठी जनतेत असंतोष उसळला आहे.

पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह

या प्रकरणात संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरीही कठोर कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप होत आहे. उलट अमराठी व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मराठी संघटनांनी केला आहे.

आमची भूमिका स्पष्ट

आजच्या पोलीस भेटीमध्ये मराठी समाजावर होणारा अन्याय, पोलिस प्रशासनाचा ढिसाळपणा आणि शहरात निर्माण झालेल्या सामाजिक तणावाबद्दल निवेदन दिले जाणार आहे. या सर्व प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, आता मराठी जनतेने संघटीत होण्याची सुरुवात केली असून मीरा-भाईंदर हे मराठी अस्मितेचं नवं रणांगण ठरत आहे.

जोधपूर स्वीट्स अँड नमकीन या मिठाई दुकानात मराठी न बोलण्यावरून वाद झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) कार्यकर्ते जबाब मागण्यासाठी गेले असता, दुकानदाराने “मराठी बोलण्याची गरज काय?” असे उत्तर दिले. यावर संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी त्याला कानशिलात लगावली. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि तिच्या निषेधार्थ दुसऱ्या दिवशी अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now