Mira Bhayandar morcha against MNS : मीरा-भाईंदर (Mira-Bhayandar) परिसरात अमराठी दुकानदारावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांकडून झालेल्या कथित मारहाणीच्या निषेधार्थ गुरुवारी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. मिरारोड (Mira Road) येथील सेवेन स्कूलपासून पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड (Prakash Gaikwad) यांच्या कार्यालयापर्यंत मोर्चा नेण्यात आला.
या घटनेनंतर स्थानिक पातळीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप (BJP) वर गंभीर आरोप केले.
भाजपवर आरोप
अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी स्पष्ट आरोप केला की, मिरारोड परिसरात ज्या दुकानदाराला मारहाण झाली, त्या दुकानदाराने पुढे वाद मिटवण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, भाजपच्या स्थानिक नेत्यांनी (BJP local leaders) राजकीय फायद्यासाठी व्यापाऱ्यांना मोर्चा काढण्यासाठी उचकावले.
त्यांनी हेही सांगितले की मिरारोडमधील फक्त एका लहानशा भागातील २५ ते ५० दुकानदारांनी बंदमध्ये भाग घेतला आणि या आंदोलनात भाजपशी संबंधित वकील, पदाधिकारी आणि नरेंद्र मेहता (Narendra Mehta) यांच्या कुटुंबातील सदस्य सहभागी होते.
भाजप कार्यकर्त्याचा मनसे प्रवेश, नाराजीची कारणं स्पष्ट
मनसेच्या (MNS) अधिकृत सोशल मिडिया हँडलवरून दिलेल्या माहितीनुसार, पेंकरपाडा येथील भाजप प्रभाग अध्यक्ष कुंदन सुरेश मानकर (Kundan Suresh Mankar) यांनी भाजपला रामराम ठोकून मनसेत प्रवेश केला. मोर्चाविरोधात नाराजी व्यक्त करत आणि स्थानिक भाजप आमदारांवर रोष दर्शवत त्यांनी हा निर्णय घेतल्याचे मनसेच्या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले.
व्हिडीओ क्लिपमध्ये फसवणूक, अविनाश जाधवांचा आरोप
मनसेने दावा केला की अमराठी दुकानदाराला मारहाण करतानाचा केवळ ४० सेकंदांचा व्हिडीओ भाजपकडून व्हायरल करण्यात आला. त्या व्हिडीओमध्ये मूळ घटनेच्या आधी आणि नंतर काय घडलं हे दाखवण्यात आलेलं नाही. केवळ राजकीय वातावरण तापवण्यासाठी भाजपने (BJP) मुद्दामून निवडक क्लिप सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा आरोप अविनाश जाधव यांनी केला.
मोर्चात सहभागी व्यापाऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे मागणी केली की, भविष्यात अशा प्रकारच्या घटना इतर कोणासोबतही घडू नयेत, यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात. व्यापाऱ्यांनी चिंता व्यक्त करत सांगितले की, मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेली मारहाण ही कोणालाही कधीही भोगावी लागू शकते.