MCA Election : आचारसंहितेनंतर राज्यातील राजकारणाबरोबरच क्रीडाक्षेत्रातही मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला असून, अजिंक्य नाईक (Ajinkya Naik) यांच्या नेतृत्वाखालील गटाने तब्बल 12 जागांवर विजय मिळवला आहे. उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या काट्याच्या लढतीत जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी नवीन शेट्टी (Naveen Shetty) यांचा 48 मतांनी पराभव करत विजय मिळवला, तर सचिवपदी उन्मेष खानविलकर (Umesh Khanvilkar) यांची निवड झाली आहे.
संयुक्त सचिव म्हणून निलेश भोसले (Nilesh Bhosale) यांनी गौरव पय्याडे (Gaurav Payyade) यांना पराभूत करत बाजी मारली. खजिनदार पदावर अरमान मलिक (Armaan Malik) यांनी विजय मिळवला असून त्यांनी सुरेंद्र शेवाळे (Surendra Shewale) यांचा पराभव केला. या निवडणुकीत एकूण 362 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
अध्यक्षपदावर अजिंक्य नाईक यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली होती. मात्र, उपाध्यक्ष, सचिव आणि अन्य पदांसाठी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत नाईक गटाने मोठे यश मिळवले, तर आशीष शेलार (Ashish Shelar) गटाशी संबंधित फक्त चार उमेदवारांनी विजय मिळवला.
मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणुकीतील महत्त्वाचे निकाल:
-
उपाध्यक्ष: जितेंद्र आव्हाड – 203 मते (विजयी), नवीन शेट्टी – 155 मते
-
सचिव: उन्मेष खानविलकर – 227 मते (विजयी), शाह आलम शेख – 129 मते
-
संयुक्त सचिव: निलेश भोसले – 228 मते (विजयी), गौरव पय्याडे – 128 मते
-
खजिनदार: अरमान मलिक – 237 मते (विजयी), सुरेंद्र शेवाळे – 119 मते
ॲपेक्स कौन्सिल विजेते:
संदीप विचारे – 247, सूरज समत – 246, मिलिंद नार्वेकर – 242, विघ्नेश कदम – 242, भूषण पाटील – 208, नदीम मेमन – 198, विकास रेपाळे – 185, प्रमोद यादव – 186, नील सावंत – 178 मते मिळवत विजयी ठरले.
दरम्यान, अजिंक्य नाईक यांनी निकालानंतर आपली भावना व्यक्त करताना म्हटलं की, “हा विजय आमच्या मैदान क्लब्स, सचिव आणि सर्व महिला-पुरुष क्रिकेटपटूंचा आहे. हा केवळ माझा नाही तर संपूर्ण मुंबई क्रिकेट परिवाराचा अभिमान आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पाठिंब्यामुळेच हा प्रवास शक्य झाला. तसेच आशीष शेलार यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही ही लढाई जिंकू शकलो.”






