Marriage Letter to Sharad Pawar: माझं लग्न जमत नाहीये, मला जोडीदार मिळवून द्या, तुमचे उपकार कधीही विसरणार नाही; व्याकुळ अविवाहित तरुणाचं शरद पवारांना पत्र

Marriage Letter to Sharad Pawar:  अकोला (Akola) जिल्ह्यातील एका अविवाहित तरुणाने आपला एकाकीपणा व्यक्त करत थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार (Sharad Pawar) यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्याने आपल्या आयुष्यातील एक वेदनादायक प्रश्न मांडला. “माझं लग्न होत नाहीये, कृपया मला पत्नी मिळवून द्या. मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही.” या भावनिक निवेदनाने नेतेमंडळींचे लक्ष वेधून घेतले असून, ते आता संपूर्ण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे.

शनिवारी अकोल्यात शरद पवार शेतकरी संवाद कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी नागरिकांकडून विविध निवेदनं स्वीकारली जात होती. त्यात या तरुणाचे पत्रही देण्यात आले. हे पत्र वाचल्यानंतर व्यासपीठावरील सर्वच नेते काही क्षणांसाठी गप्प झाले. पत्रात त्याने स्वतःचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक दिला असून, आपला एकाकीपणा स्पष्टपणे मांडला आहे.

या तरुणाने म्हटलं आहे की, “माझं वय वाढत चाललं आहे. भविष्यात माझं लग्न होणार नाही, असं दिसतंय. मी आयुष्यभर एकटाच राहीन. कृपया माझ्या जीवनाचा विचार करा आणि मला पत्नी मिळवून द्या. मला कोणत्याही समाजातील मुलगी चालेल. तिच्या घरी राहायला मी तयार आहे. मी प्रामाणिकपणे संसार चालवीन आणि तिची काळजी घेईन. तुम्ही माझ्यासाठी हे केलंत तर मी तुमचे उपकार कधीही विसरणार नाही.”

या पत्रामुळे ग्रामीण भागातील तरुणांमधील विवाहप्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अनेक तरुणांना, विशेषतः शेती करणाऱ्या आणि ग्रामीण भागात राहणाऱ्यांना, लग्नासाठी मुली मिळत नसल्याचं वास्तव यातून स्पष्ट होतं. शिक्षण आणि नोकरीच्या संधींमुळे मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. शहरात नोकरी करणाऱ्या मुलांना मुलींची पसंती वाढली आहे, तर ग्रामीण भागातील तरुण मात्र मागे पडले आहेत.

आता या तरुणाच्या मनातील आर्त विनंतीवर शरद पवार काही उपाय करतील का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्याचं पत्र सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, अनेकांनी त्याच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे.