Share

Marathi Ekikaran Samiti Govardhan Deshmukh: “आमच्यासोबत लोढासारखे मंत्री नाहीत हे दुर्दैव, आमच्यासाठी गृहमंत्री नाही, मुख्यमंत्री, गृहमंत्री एका विशिष्ट समाजासाठी”; मराठी एकीकरण समितीच्या गोवर्धन देशमुखांचा संताप

Marathi Ekikaran Samiti Govardhan Deshmukh : दादरमधील कबूतरखाना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंदिस्त केल्यानंतर जैन समाजाकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली. एवढंच नव्हे तर काही जैन तरुणींनी शस्त्र उचलण्याच्या भाषणांमुळे वातावरण तापलं. या घडामोडींवर प्रतिक्रिया देत मराठी एकीकरण समितीचे (Marathi Ekikaran Samiti) कार्यकर्ते आज दादरमध्ये कबूतरखाना बंदीच्या समर्थनार्थ आंदोलनासाठी जमले. मात्र, हे आंदोलन पोलिसांनी जोरजबरी करून पांगवलं आणि यावेळी चांगलीच धक्काबुक्की झाली.

आंदोलनादरम्यान गोवर्धन देशमुख (Govardhan Deshmukh) यांनी पोलिसांवर मराठीसाठी रक्त काढल्याचा गंभीर आरोप केला आणि आपला हात मोडल्याचं सांगितलं. त्यांनी यावेळी संताप व्यक्त करत मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर थेट निशाणा साधला.

“आमच्यासाठी गृहमंत्रीच नाहीत”

देशमुखांनी आरोप केला की, ज्या वेळी जैन समाजाकडून चाकू-सुऱ्यांसह आंदोलन झालं, तेव्हा पोलीस कुठे होते? पण मराठी हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्यांवर मात्र बळाचा वापर होतो. “आमच्या सोबत लोढासारखे मंत्री नाहीत हे आमचं दुर्दैव आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री एका विशिष्ट समाजासाठी आहेत,” असा आरोप त्यांनी केला.

तसेच, कायदा सुव्यवस्था कोणी हातात घेतली तर महामोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला. “हा विषय धर्माचा नसून आरोग्याचा आहे, कारण कबूतरांमुळे पसरणाऱ्या आजारांपासून नागरिकांचं रक्षण होणं गरजेचं आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं. पोलिसांसाठी आंदोलनाला गेलो असताना जखमेचं ‘बक्षीस’ मिळालं, अशी टीकाही त्यांनी केली.

राजकीय पक्षांना उभं राहण्याचं आवाहन

देशमुखांनी सांगितलं की, त्यांनी राजकीय पक्षांना मराठी हक्कांच्या बाजूने उभं राहण्याचं आवाहन केलं होतं. पण, कोणीही त्यांच्या बाजूने उभं राहिलं नाही. “राजाच्या हितासाठी राजकीय पुढारी एकत्र यावेत,” असं आवाहन करत त्यांनी मराठ्यांनी हिंदुत्व जपल्याचंही नमूद केलं.

निवेदनातील आरोप

मराठी एकीकरण समितीच्या निवेदनात म्हटलं आहे की, एका विशिष्ट समाजाच्या धर्माच्या नावाखाली कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे. शस्त्रे दाखवणं, मोर्चा काढण्याची धमकी देणं अशा गोष्टींमुळे असंतोष निर्माण होतो. याला वेळीच आवर न घातल्यास मराठी समाजालाही प्रतिउत्तरादाखल मोर्चे काढावे लागतील.

तसेच, दादर कबूतरखाना बंदिस्त केल्यानंतर काही व्यक्तींनी फीडिंग एरिया तोडून कबुतरांना खाद्य देत उच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केलं आहे. ही कृती केवळ न्यायालयाचा अवमान नसून पालिका आणि पोलिसांनाही थेट विरोध आहे, असा आरोप करण्यात आला आहे.

गंभीर गुन्ह्यांची नोंद व कारवाईची मागणी

निवेदनात पुढे नमूद केलं आहे की, मुंबई महानगरपालिका आणि आरोग्य विभागाच्या अधिकृत आदेशांचं उल्लंघन करण्यात आलं आहे. हे उल्लंघन उच्च न्यायालय अवमान अधिनियम 1971, मुंबई महापालिका कायदा कलम 38, 39, 39 बी, महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम तसेच भारतीय दंड संहितेतील विविध कलमांखाली दंडनीय आहे.

मराठी एकीकरण समितीने पोलिसांना आवाहन केलं आहे की, कोणताही पक्षपात न करता सर्व संबंधितांवर एफआयआर नोंदवून कठोर कारवाई करावी. इतर आंदोलकांप्रमाणेच समान निकषांवर धरपकड आणि जामिनास विरोध केला जावा, जेणेकरून न्यायव्यवस्थेवरील विश्वास कायम राहील.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now