Sagar Karande : ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या घटनांमध्ये आता सामान्य नागरिकांबरोबरच सेलिब्रिटीही अडकताना दिसत आहेत. मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध विनोदी कलाकार सागर कारंडे यांनाही एका सायबर स्कॅमचा मोठा फटका बसला असून, ६१.८३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
इन्स्टाग्राम लिंक, घरबसल्या कमाईचा दावा आणि सुरू झाली फसवणूक
सागर कारंडेला फेब्रुवारी महिन्यात अनओळखी क्रमांकावरून व्हॉट्सअॅप मेसेज आला. एका महिलेनं त्याला इन्स्टाग्राम लिंक पाठवली आणि त्या लिंकवरील पोस्ट लाईक केल्यास प्रत्येक ‘लाईक’साठी १५० रुपये मिळतील, असा दावा केला. घरबसल्या पैसे कमावण्याची संधी वाटल्याने सागरने त्यात सहभाग घेतला.
विश्वास संपादन, थोडी कमाई आणि मग गुंतवणुकीची साखळी
स्कॅमर्सनी सुरुवातीला ११ हजार रुपये सागरला दिले, जेणेकरून त्याचा विश्वास बसावा. यानंतर सागर कारंडेला मोठ्या कमाईच्या आमिषाने गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आलं. सागरने सुरुवातीला २७ लाख रुपये भरले. पण पैसे परत मिळवण्यासाठी आणखी कामे पूर्ण करा आणि शंभर टक्के रक्कम जमा करा, असे सांगून त्याच्याकडून टप्प्याटप्प्याने अधिक पैसे उकळले गेले.
टप्प्याटप्प्याने रक्कम भरली, पण परत काहीच मिळाले नाही
सागरने पुढे १९ लाख रुपये आणि त्यावर ३० टक्के कर भरून एकूण ६१.८३ लाख रुपयांची रक्कम दिली. मात्र, त्यानंतरही त्याला एक रुपयाही परत मिळाला नाही. उलट “कर चुकीच्या खात्यात गेला”, असे सांगून अजून पैशांची मागणी केली जात होती.
शोध लागला फसवणुकीचा, सायबर पोलिसांकडे तक्रार
या सगळ्या प्रकारानंतर सागरला फसवणुकीचा संशय आला आणि त्याने तात्काळ सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. उत्तर विभाग सायबर पोलीस ठाण्यात तीन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फसवणुकीचे वाढते प्रकार – सावध राहा
ही घटना पुन्हा एकदा दाखवते की सायबर गुन्हेगारी किती सुसूत्र आणि भ्रामक असू शकते. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहज पैसे कमावण्याच्या आमिषाला बळी पडू नये, कुठल्याही आर्थिक व्यवहाराआधी खातरजमा करणे गरजेचे आहे, हेच या प्रकरणातून अधोरेखित होते.
सागर कारंडेसारख्या प्रसिद्ध व्यक्तीलाही ऑनलाइन फसवणुकीने गाठले आहे, म्हणजे सामान्य नागरिक किती सहज अशा जाळ्यात अडकू शकतात, याचा अंदाज येतो. नागरिकांनी सावध राहून, अनोळखी मेसेजेस किंवा लिंकवर क्लिक न करता तत्काळ संबंधित यंत्रणांकडे माहिती देणे ही काळाची गरज आहे.