ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंबाबत आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करणाऱ्या मराठी अभिनेत्याला अटक

ठाण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध सोशल मिडियाद्वारे आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्या मयुर उर्फ मयुरेश मुरलीधर कोटकर ३७, रा. बाळकूम पाडा, ठाणे याला श्रीनगर पोलिसांनी रविवारी पहाटेच्या सुमारास अटक केली आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून सध्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर फेसबुकवर पोस्ट करण्यात आला. पालकमंत्र्याविषयी असलेला हा आक्षेपार्ह मजकूर वागळे इस्टेटमधील शिवसेनेचे नगरसेवक योगेश जानकर यांच्या निदर्शनास आला.

नवी मुंबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी दि बा पाटील यांचे नाव देण्यात यावे, यासाठी आगरी समाजाने रस्त्यावर उतरुन मानवी साखळी तयार केली होती. त्यावेळीही मयुरेश कोटकर उतरले होते. त्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध कोटकरांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती.

जानकर यांनी याबाबत श्रीनगर पोलिस ठाण्यात धाव घेत, कोटकर यांच्याविषयी तक्रार केली. त्याप्रकरणी अभिनेता मयुरेशयास पोलिसांनी अटक केली आहे. त्यास न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्यांना आज जामीन मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी फेसबुकवरून हा आक्षेपार्ह मजकूर डिलीट केला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.