Ajit Pawar on Chhagan Bhujbal : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईतील आझाद मैदान (Azad Maidan) येथे बेमुदत उपोषण सुरू केल्यावर राज्य सरकारने मराठा आरक्षण (Maratha Reservation) संदर्भातील आठ मागण्यांपैकी सहा मान्य केल्या. या निर्णयासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) जारी झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
अजित पवार म्हणाले, “लोकशाहीत प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. प्रत्येक जण आपल्या व्यासपीठावरून आपले मत मांडतो. माझे स्पष्ट मत आहे की समाजामध्ये तेढ निर्माण करू नये. कुणालाही नाराज करण्याचा हेतू नसावा. प्रत्येक व्यक्ती सद्सद्विवेक बुद्धीने बोलत असतो.”
ओबीसी समाजाची प्रतिक्रिया
मराठा आरक्षणाच्या जीआरवरून ओबीसी समाजात असंतोष आहे. यावर अजित पवार म्हणाले, “कुणाच्याही तोंडातील घास काढून दिला जाणार नाही. निर्णय घेतल्यावर सहसा दोन मतप्रवाह निर्माण होतात. जीआर काढल्यापासून चर्चेचा स्वरूप हळूहळू बदलला आहे.” तसेच हैदराबाद गॅझेट (Hyderabad Gazette) संदर्भाने बंजारा आणि वंजारी समाजात वाद निर्माण झाल्याची माहिती दिली. अजित पवार म्हणाले, “एससी-एसटी समाजात कोणते घटक घालायचे, हा निर्णय फक्त संसदेला आहे, राज्य सरकारला नाही. गरीब लोकांसाठी आयडब्ल्यूएस आरक्षण आहे.”
राष्ट्रवादी चिंतन शिबिरावर प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिराबाबत अजित पवार म्हणाले, “राज्यात राष्ट्रवादीमय वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. विदर्भात शिबिर घेतले आहे, शिर्डी आणि रायगडमध्ये यापूर्वी शिबिर झाले होते. विदर्भातील सात जागांपैकी सहा जागा जिंकल्या, सातवी मैत्रीपूर्ण पद्धतीने मिळाली. यंदा भाषण न करता कृतीशील कार्यक्रम घेतले आहेत. विविध विषयांवर गट तयार झाले आहेत. तळागाळातील प्रश्न मला ऑन रेकॉर्ड फाईलवर मिळतील. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रश्न आमच्या हातात असतील.”