Pravin Gaikwad attack: अक्कलकोट (Akkalkot) येथे रविवारी घडलेल्या घटनेने महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे. संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) चे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Pravin Gaikwad) यांच्यावर काही अज्ञात इसमांनी काळी शाई फेकून हल्ला केला. फत्तेसिंह शिक्षण संस्था (Fattesingh Shikshan Sanstha) आणि सकल मराठा समाज यांच्या कार्यक्रमासाठी ते अक्कलकोट येथे आले असताना त्यांच्या वाहनासमोर काही व्यक्तींनी अचानक शाई फेकली आणि त्यांना खाली खेचून धक्काबुक्की केली.
या हल्ल्यामागे शिवधर्म फाउंडेशन (Shivdharma Foundation) या भाजपशी संबंधित संघटनेचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्याच्या प्रकरणात दीपक काटे (Deepak Kate) जो भाजप युवा मोर्चाचा राज्य सचिव आहे. तसेच किरण साळुंखे (Kiran Salunkhe), भवानेश्वर शिरगिरे (Bhavaneshwar Shirgire) यांच्यासह सात जणांवर अक्कलकोट उत्तर पोलिस ठाणे येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी दोन आरोपींना अटक झाली असून उर्वरित पाच फरार आहेत.
या घटनेनंतर मराठा क्रांती मोर्चाच्या ज्येष्ठ समन्वयक दिलीपभाऊ कोल्हे (Dilipbhau Kolhe) यांनी माध्यमांशी बोलताना या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “प्रवीण गायकवाड हे कुटुंबासह कार्यक्रमात सहभागी होते. अशावेळी त्यांच्यावर असा भ्याड हल्ला करणे अत्यंत लज्जास्पद आणि निंदनीय आहे. संविधान प्रत्येकाला मत मांडण्याचा आणि आंदोलने करण्याचा हक्क देतो, मात्र हिंसक पद्धतीने व्यक्तीवर हल्ला करणे हे लोकशाहीला बाधक आहे.”
या हल्ल्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. सुप्रिया सुळे (Supriya Sule), प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar), जितेंद्र आव्हाड, रोहित पवार (Rohit Pawar) यांसारख्या नेत्यांनी याचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही प्रवीण गायकवाड यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
हल्ल्यानंतर पंढरपूर (Pandharpur) येथे संभाजी ब्रिगेड च्या कार्यकर्त्यांनी गायकवाड यांचा दुग्धाभिषेक करून समर्थन दर्शवले. राज्यात मराठा समाजात यामुळे अस्वस्थता निर्माण झाली असून, राजकीय वातावरणही तापले आहे. हल्लेखोरांवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सर्वत्र होत आहे. पोलिस तपास वेगाने सुरू असून, पुढील हालचालीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.