Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवर थरकाप उडवणारा आरोप, जीव घेण्यासाठी काय-काय केलं?

Manoj Jarange : मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात भूकंप घडवला आहे. आपल्या हत्येचा कट रचल्याचा दावा करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर थेट गंभीर आरोप केले आहेत. “माझ्या हत्येच्या कटाचा मूळ कारभारी धनंजय मुंडेच आहेत,” असं जरांगे यांनी म्हटलं असून, त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

“माझ्या हत्येचा कट रचला गेला, अडीच कोटींची डील ठरली”

जरांगे यांनी पत्रकार परिषदेत उघड केले की, त्यांच्या हत्येचा कट रचण्यासाठी सुमारे १० ते ११ जण सहभागी होते. “मी बाहेरच्या राज्याची गाडी देतो,” असं धनंजय मुंडे यांनी आरोपींना सांगितल्याचा त्यांचा दावा आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, या कटामध्ये पकडले गेलेले दोन आरोपी हे बीड जिल्ह्यातील एका नेत्याच्या निकटवर्तीय आहेत.

त्यांच्या मते, सुरुवातीला या आरोपींना खोटं रेकॉर्डिंग बनवण्याचं काम देण्यात आलं, पण नंतर “खूनच करून टाकायचा” असा निर्णय घेण्यात आला. जरांगे म्हणाले, “अडीच कोटी रुपयांची डील ठरली होती. परळी (Parli) येथे धनंजय मुंडे आरोपीला भेटले आणि तब्बल २० मिनिटं चर्चा केली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे झालटा फाटा या ठिकाणी पुन्हा आरोपींसोबत त्यांची बैठक झाली.”

“गोळ्या देऊन, औषध देऊन संपवायचा कट होता”

जरांगे यांच्या म्हणण्यानुसार, आरोपींना गोळ्या किंवा औषधांच्या माध्यमातून घातपात करण्याच्या सूचना दिल्या गेल्या होत्या. त्यांनी उघड केलं की, भाऊबीजेच्या दिवशी पुन्हा एकदा त्यांच्याविरोधात हल्ल्याचा कट रचण्यात आला होता. “मुंडेंच्या पीएने पकडलेल्या आरोपींपैकी एकाला परळीला नेलं आणि धनंजय मुंडेंनी स्वतः त्याच्याशी भेट घेतली,” असा दावा त्यांनी केला.

“धनंजय मुंडे नीच राजकारण करत आहेत” 

आपल्या वक्तव्यात जरांगे यांनी सांगितलं की, “राजकारणात पुढे जाण्यासाठी माणसाचा जीव घेऊन कुणी मोठं होत नाही. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) साहेबांनी कधी असं राजकारण केलं नाही. त्यांनी लोकांना उचलून धरलं, पण धनंजय मुंडे नीच राजकारण करत आहेत. लोकं मारून, डावं करून ते प्रतिस्पर्ध्यांना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत.”

जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन करताना सांगितलं, “आपण सावध होतो म्हणून ही घटना आधीच उघडकीस आली. समाजाने शांतता राखली पाहिजे, पण निष्क्रीय राहू नये. आज माझ्यावर वेळ आली, उद्या ती तुमच्यावरही येऊ शकते.”

त्यांनी पुढे म्हटलं, “मराठा समाजातील सरपंचांपासून खासदारांपर्यंत सगळ्यांनी हा विषय गांभीर्याने घ्यावा. आपण एकजुटीने उभं राहून अशा नीच वृत्तीचा नायनाट करायला हवा. मी स्वतः याच्या मुळाशी जाणार आहे, कारण असल्या अवलादी संपल्या पाहिजेत.”

जरांगे यांच्या या थेट आरोपांमुळे राज्यात राजकीय तणाव निर्माण झाला आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात आधीच आघाडीवर असलेल्या जरांगे यांनी आता धनंजय मुंडेंच्या विरोधात उघडपणे भूमिका घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अस्वस्थता आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पोलिस तपासात आणखी नवी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.