Manoj Jarange Patil : धनंजय मुंडेंची चौकशी करा, नाहीतर फटका बसेल; त्यांनी माझी 2.5 कोटींची सुपारी दिलीय, जरांगेंचा आरोप

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी एक धडकी भरवणारा आरोप करत राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवली आहे. त्यांनी जाहीर केलं की, धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी त्यांच्या जीवावर केलेल्या कटासाठी तब्बल 2.5 कोटींची सुपारी दिली होती आणि या कटात सामील असलेल्या तीन लोकांनी चौकशीत हे कबूलही केलं आहे.

जरांगे यांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी नाव उघडपणे घेतलं असतानाही संबंधितांना चौकशीसाठी बोलावलं जात नाही. “सत्तेचा माज आहे, त्यामुळे कारवाई होत नाही. पण सत्ता गेल्यावर याचाच फटका बसेल,” असा तीव्र इशारा त्यांनी दिला. त्यांनी पुढे सांगितलं की, “मराठा समाज प्रत्येक गावातून माझ्या पाठिशी उभा आहे. जिथे माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न कराल, तिथे मराठा तरुण दगड घेऊन उभे दिसतील.”

आपल्या भाषणात जरांगे यांनी स्पष्ट केलं की, आपण निष्काळजी राहिलो म्हणून आपल्यावर वारंवार घाला आला, पण आता ही चूक पुन्हा होऊ देणार नाही. “गरीब मराठ्यात अफाट ताकद आहे, पण आपण स्वतःची ताकद ओळखली नाही. बाकीचे सावध राहिले म्हणून पुढे गेले. आपण सावध राहिलो तरच आपली लढाई मजबूत राहील,” असं ते म्हणाले.

त्यांनी श्रीमंत आणि गरीब मराठ्यांमधील दरीचा उल्लेख करत सांगितलं की, गरीब मराठ्याला कोणी आवाज देत नसल्यानेच त्यांनी आंदोलनाच्या मैदानात उतरायचं ठरवलं. “मुंबई बंद करण्याची ताकद मराठ्यात आहे. सत्ता-पक्ष बदलत राहतील, पण आपली एकजूट तुटू नये, एकमेकांसाठी धावणं महत्त्वाचं,” असा संदेश त्यांनी दिला.

मुंबईतील आंदोलनाचा उल्लेख करत जरांगे म्हणाले की सरकार जनतेला नाही, तर त्यांच्या भाकरीला घाबरतं. त्यांनी काहींनी केलेल्या आरोपांचा समाचार घेत, “मराठ्यांनी दारूला सोडावं. जर कोणी सोडत नसेल तर घरातील महिलांनी त्यांची भाकरी बंद करावी,” अशी अप्रत्यक्ष पण कठोर हाक दिली.

त्यांनी पुढे सांगितलं की, समाजात एकमेकांवर खटले करू नका. शिक्षण महाग झालं असलं तरी आरक्षणामुळे फी कमी होणार आहे, तर सरकारी नोकऱ्यांमध्ये तरुणांना संधी वाढणार आहे. मराठवाड्यातील सर्व मराठा ओबीसीमध्ये सामील होणार असून, पश्चिम महाराष्ट्रातील चारही गॅजेट लागू झाल्याने कोकणालाही फायदा होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.

जरांगेंनी महिलांना उद्देशून हाक मारली “लाडक्या बहिणींनो, 1500 रुपयांच्या फसव्या योजना स्वीकारून आंधळं होऊ नका. आयुष्यभर उभं करायचं आहे, पुढील पिढी मजबूत व्हावी लागेल.” मुंबईत लाखो मराठे एकत्र आले, एकाही महिलेला त्रास न देता आंदोलन पार पडलं, याचा त्यांनी अभिमानाने उल्लेख केला. आता पुढचा टप्पा दिल्ली असल्याचं सांगत, “मराठे दिल्लीकडे कूच करणार,” असा त्यांनी निर्धार व्यक्त केला.

जरांगेंचा आरोप आणखी गंभीर बनतो जेव्हा ते म्हणतात “माझ्या घातपातात सहभागी लोकांना ज्यांना क्लीन चिट मिळाली, त्यामागे मोठ्या नेत्यांच्या पायाशी पडण्याचं राजकारण होतं.” ते म्हणाले की, त्यांनी स्वतः नार्को टेस्टसाठी अर्ज केला आहे. पोलिस संरक्षणही त्यांनी नाकारलं.

“तीन आरोपींनी नाव घेतलं असेल तर त्याला अटक करा. माझी आणि त्यांची दोघांचीही नार्को टेस्ट करा,” असा ठराविक स्वरातील आव्हान त्यांनी राज्ययंत्रणेला दिलं.