Manoj Jarange : शरद पवार यांनी आमचं वाटोळ केलंच, पण ज्यांना आरक्षण दिलं… मनोज जरांगे यांचा थेट आरोप

Manoj Jarange : महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकारण सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तापलेलं आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी झगडणारे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा आपली आक्रमक भूमिका स्पष्ट करत ओबीसी नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्यावर सडकून टीका केली आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरही थेट आरोप लावले.

विजय वडेट्टीवार यांनी अलीकडेच दिलेल्या एका वक्तव्यात मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर टीका करत म्हटलं होतं की, “एकाच समाजाला सगळं काही पाहिजे, मग ओबीसी समाज जगायचा कसा?” तसेच त्यांनी ३७४ ओबीसी जातींना जरांगे यांच्या “ताकदीच्या भरवशावर” समुद्रात बुडवून मारण्याची टीका केली होती. त्यावर मनोज जरांगे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं.

जरांगे म्हणाले की, “ओबीसींच्या ३७४ जातींना कोणी संपवलं, याचा विचार ओबीसी समाजाने करायला हवा. १६ टक्के मराठा आरक्षण जर कोणी दिलं असेल, तर त्यातही ओबीसी नेत्यांनीच फसवणूक केली आहे.” त्यांनी थेट नाव न घेता विजय वडेट्टीवार आणि त्यांच्या पक्षातील जुन्या नेत्यांवर आरोप लावले की, “ओबीसींचा घात त्यांनीच केला आहे.”

मनोज जरांगे (Jarange) यांनी स्पष्ट केलं की, “१९९४ साली १६ टक्के आरक्षण मराठ्यांना देण्यात आलं. हे आरक्षण देताना ओबीसींचं ठरलेलं १४ टक्के आरक्षण पक्कं होतं. तरीही आमचं आरक्षण दिलं, आणि नंतर तेच आरक्षण न्यायालयात टिकवता आलं नाही. त्यामुळे आमचं वाटोळं ज्यांनी केलं, तेच यांचे उपकार विसरले आहेत.”

ओबीसी समाजाच्या मोर्चाबाबत विचारल्यावर मनोज जरांगे (Jarange) म्हणाले की, “मोर्चा काढू द्या, काय फरक पडतो? आतापर्यंत आमचं १६ टक्के आरक्षण खाल्लं आहे. आम्ही नियमांनुसार लढतोय. आमच्याकडे प्रत्येक गोष्टीचे आधार आहेत. हैदराबाद गॅझेटचा जीआर निघालेला आहे. तरीही आम्हाला त्रास दिला जातो. हे दुर्दैव आहे.”

ते पुढे म्हणाले, “मराठा समाजाला आज संघर्ष करावा लागतोय, नियमांमध्ये राहूनसुद्धा. ओबीसींना मात्र सगळं सोपं मिळतंय. न्यायाची लढाई लढताना आमच्यावरच आरोप केले जात आहेत.”