Manoj Jarang : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी 29 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईत आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, आता आंदोलन माघारी घेण्याचा प्रश्नच नाही, आणि आंदोलनाची पुढील टप्प्याची रूपरेषा 1 ऑगस्टला जाहीर करण्यात येईल.
मनोज जरांगे म्हणाले, “सरकारने गेल्या दोन वर्षांत वेळकाढूपणा केला आहे. मागील उपोषणानंतर सरकारने चार प्रमुख मागण्या तात्काळ मान्य करण्याचं आश्वासन दिलं होतं, पण आज तीन महिने उलटले तरी अंमलबजावणी झालेली नाही.” त्यांनी मराठा समाजाला उद्देशून सांगितले की, आता संयमाचा बांध तुटला असून, सगळ्यांनी तयारीत राहावे. “28 ऑगस्टला मला फक्त मुंबईत सोडायला या, बाकी मी सांभाळेन,” असे आवाहन त्यांनी केलं.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधत, “सत्ता ही टिकणारी नसते, गर्वात राहू नका,” असा इशारा दिला. त्यांनी सांगितले की, “गॅझेटियर, केसेस आणि मराठा-कुणबी एक असल्याचे अध्यादेश तातडीने काढा, आणि प्रमाणपत्र वाटप सुरू करा.”
त्याचप्रमाणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावरही त्यांनी टीका करत म्हटलं की, “आमच्या हक्काचं काही असेल तर कोणीही विरोध केला तरी ते आम्हाला मिळालंच पाहिजे.”
जरांगे यांनी आंदोलन शांततेच्या मार्गानेच सुरू ठेवण्याची भूमिका मांडली आहे. “शांततेत उपोषण केल्याशिवाय आमच्या समाजाला न्याय मिळणार नाही. माझ्या समाजासाठी, त्यांच्या लेकरांसाठी मी हे सगळं करत आहे. कोणीही रुसू नका, माझ्यासोबत ताकतीने उभं राहा,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “सात कोटी मराठा माझ्यासोबत आहेत. मी खंबीर आहे. आता कुठलाही मागे हटण्याचा विचार नाही. सरकारने जर अजूनही गांभीर्याने पावलं उचलली नाहीत, तर हे आंदोलन निर्णायक ठरेल.”
ही लढाई आता निर्णायक टप्प्यात जात असल्याचे स्पष्ट होत आहे. आता लक्ष 1 ऑगस्टला जाहीर होणाऱ्या पुढील आंदोलनाच्या दिशा व धोरणांकडे लागले आहे.
manoj-jarang-made-a-big-announcement