Manikrao Kokate: राज्याच्या कृषी खात्याचे मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. अधिवेशनाच्या दरम्यान विधानपरिषदेत मोबाईलवर रमी (Rummy) खेळल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्यावर मोठा राजकीय गदारोळ निर्माण झाला. यामुळे आता अजित पवार (Ajit Pawar) यांनीही त्यांच्याकडून कृषी खाते काढून घेण्याचा निर्णय घेतल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
कोकाटेंनी कोर्टाचा रस्ता धरला!
सगळ्या टीकेनंतरही कोकाटे यांनी न राजीनामा दिला, न माफी मागितली. उलट त्यांनी व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ‘मी बरोबरच आहे’ हे पुन्हा पुन्हा ठसवण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही, तर त्यांनी ‘शासन भिकारी आहे’ असे वक्तव्य करून आणखी एक वाद अंगावर घेतला. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नाराजी व्यक्त केली, तर अजित पवार यांनी कोकाटेंची भेटही टाळली.
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) मध्ये कोकाटेंच्या बाजूने कुणीही उभं राहिलं नाही. अगदी सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनीही मौन पाळले. यामुळेच अजित पवार यांनी वाईचे आमदार मकरंद पाटील (Makrand Patil) यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी सोपवण्याची शक्यता आहे.
सूरज चव्हाणच्या प्रकरणाची पुनरावृत्ती?
याआधी सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी लातूरमध्ये मारहाण करून पक्षाची नाचक्की केली होती. त्यावेळीही चव्हाण यांनी माफी मागूनही राजीनामा दिला नव्हता. अखेर अजित पवार यांनीच ट्विट करत राजीनाम्याची मागणी केली होती. आता कोकाटेंबाबतही तसाच निर्णय होण्याची चिन्हं आहेत.
आता हा संपूर्ण प्रकार फक्त कोकाटेंच्या चुकीपुरता न राहता, संपूर्ण महायुती सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट (NCP – Ajit Pawar Group) यांची विश्वासार्हता धोक्यात आणू शकतो. अजित पवारांनी यावर कडक निर्णय न घेतल्यास, शेतकरी आणि सामान्य जनतेमध्ये नाराजी वाढण्याची शक्यता आहे.