Manikrao Kokate : राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी सध्या सुरू असलेल्या वादग्रस्त परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी धार्मिक मार्ग अवलंबला आहे. नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले कोकाटे शनिमांडळ (Shanimandal) येथील सुप्रसिद्ध शनी मंदिरात दर्शनासाठी गेले. सध्या त्यांच्या मंत्रिपदावर गदा येण्याची शक्यता निर्माण झाल्याने, शनिदेवाची विशेष पूजा करून विरोधकांच्या आरोपांपासून मुक्ती मिळावी, यासाठी त्यांनी प्रार्थना केली.
शेतकऱ्यांबाबतच्या वादग्रस्त विधानामुळे आणि विधिमंडळात ऑनलाइन रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्याने माणिकराव कोकाटे मोठ्या अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका सुरू केली असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी वाढली आहे. मंगळवारी या प्रकरणात महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शनिमंदिरातील पूजा
शनिमंडळ येथील शनी मंदिर साडेसाती मुक्त स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. भाविकांमध्ये विश्वास आहे की येथे शनिवारी पूजा केल्यास संकटे दूर होतात. त्यामुळे कोकाटे यांनी शनिश्वराच्या चरणी साकडं घालून साडेसातीपासून मुक्तीची कामना केली. मंदिरात त्यांनी विधिवत पूजा, अभिषेक करून शनिदेवाला नमस्कार केला.
राजकीय नेत्यांची श्रद्धास्थान
या मंदिराला राजकीय महत्त्वही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात याच ठिकाणाहून केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह अनेक नेत्यांनी येथे दर्शन घेतले आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांचा हा दौरा केवळ धार्मिक नव्हे तर राजकीयदृष्ट्याही महत्त्वाचा मानला जातो.
वादाच्या गर्तेतून मार्ग शोधण्याचा प्रयत्न
गेल्या काही दिवसांत सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहिलेल्या कोकाटे यांनी अखेर शनिदेवाच्या चरणी जाऊन आपल्यावरील संकट दूर व्हावं अशी प्रार्थना केली. भाविकांच्या मते, शनिदेवाची कृपा लाभल्यास राजकीय अडचणीही दूर होऊ शकतात. आता कोकाटे यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.