ग्रामदैवत ते हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतीक; पुण्यातील मानाच्या पाच गणपतींची संपूर्ण माहिती वाचा..

पुणे | गणेशोत्सव पुणे शहरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, कारण याच शहरातून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली होती. पण सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होण्याआधीपासूनच काही गणपती लोकप्रिय होते. जाणून घेऊया या पाच मानाच्या गणपतींबद्दल…

कसबा गणपती
कसबा पेठेत असलेल्या देवळतला गणपती. राजमाता जिजाबाई यांनी हे देऊळ बांधले. हा गणपती एका दगडी गाभाऱ्यात असून, तांदळा स्वरूपात आहे. तांदळा म्हणजे मुखवटावजा मूर्ती.

राजमाता जिजाबाई आणि गणेशभक्त ठकार यांना झालेल्या दृष्टांतानुसार जमीन खणल्यावर ही मूर्ती सापडली, अशी आख्यायिका आहे. या मूर्तीच्या डोळ्यात हीरे व नाभिस्थानी माणिक बसवलेले आहेत. शिवाजी महाराज स्वारी पूर्वी या गणरायाचे दर्शन घेत असतं. या गणपतीला पुण्यात प्रथम पूजेचा व ग्रामदैवताचा मान आहे.

श्री तांबडी जोगेश्वरी गणपती
श्री तांबडी जोगेश्वरी गणपती हा मानाचा दूसरा गणपती आहे. तांबडी जोगेश्वरी हे पुण्याचे ग्रामदैवत आहे. ही मंदिर पुण्यातील पुरातन मंदिर असून या मंदिरातील देवीची मूर्ती स्वयंभू आहे.

शिस्तबद्ध मिरवणूक हे गणपतीचे वैशिष्ट्ये आहे. या मंडळाची सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा लोकमान्य टिळक यांच्या काळातील आहे. पान १९६० पासून मंडळाने मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली.

सुरुवातीला गणपतीची स्थापना तांबडी जोगेश्वरी मंदिरात केली जायची, परंतु २००० सालापासून मंदिराच्या बाहेर मंडपात मूर्तीची स्थापना होते.

गुरुजी तालिम गणपती
गुरुजी तालिम हा मानाचा तिसरा गणपती आहे. सुरुवातीला हा गणपती बुधवार पेठेतल्या तालमीत बसवण्यात येत होता. सध्या तालिम अस्तित्वात नसल्याने लक्ष्मी रोडवरच्या गणपती चौकात हा गणपती बसवला जातो.

भिकु शिंदे, नानासाहेब खासगीवाले व शेख कासम वल्लाद यांनी या गणपती मंडळाची स्थापना केली. म्हणूनच हा गणपती हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानला जातो. या गणपतीला सुवर्ण आभूषणे आहेत.

तुळशीबाग गणपती
श्री तुळशीबाग गणपती हा मानाचा चौथा गणपती आहे. या गणपतीची स्थापना १९०१ मध्ये करण्यात आली. तुळशीबागेतल्या मोक्याच्या आणि वर्दळीच्या भागात हा गणपती बसतो.

१३ फुट उंचीची ही गणेशमूर्ती अतिशय आकर्षक आणि मनोवेधक आहे. या गणपतीला ८० किलो वजनाचे चांदीचे आभूषणे आहे.

केसरी गणपती
पाचवा मानाचा गणपती म्हणजे केसरी गणपती. केसरी संस्थेचा हा गणेशोत्सव १८९४ पासून सुरू झाला. त्या वेळी लोकमान्य टिळक हे विंचुकर वाड्यात राहत होते. पण १९०५ पासून टिळक वाड्यात केसरी संस्थेचा उत्सव होऊ लागला.

या उत्सवात लोकमान्य टिळकांची व्याख्याने इथे होतं असतं. या गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतून निघते. १९९८ मध्ये इथली मूर्ती संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमधील वर्णनाप्रमाणे तयार करण्यात आली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.